बॉल टॅम्परिंग हा एकच शब्द सध्या क्रीडा जगतात अनेक चर्चांना हवा देत आहे. केप टाऊन येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आणि अनेकांनीच याविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली. ही घटना समोर येताच ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या स्टीव्ह स्मिथला पुढच्या कसोटी सामन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोशल मीडियावरही या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियातील नागरिकांनीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची खिल्ली उडवल्याचंही पाहायला मिळालं. ट्रीपल जे या स्थानिक रेडिओ वाहिनीने एक स्पूफ व्हिडिओ तयार केला असून, आपल्याच देशाच्या क्रिकेट संघाने केलेल्या चुकीच्या कृतीवर विनोदी अंगाने भाष्य केलं आहे.
इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानेही हा व्हिडिओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केल्यामुळे तो आणखीनच चर्चेत आला आहे. १९८१ मध्ये झालेल्या अशाच एका प्रसंगावरही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्यावेळी ग्रेग चॅपल यांनी त्यांचा भाऊ आणि क्रिकेट खेळाडू ट्रेवर चॅपल याला अंडरआर्म चेंडू टाकण्यास सांगितलं होतं. सोशल मीडियावर जिथे बॉल टॅम्परिंगच्या मुद्द्याला बरंच महत्त्वं दिलं जात आहे तिथे या व्हिडिओला बरेच व्ह्यूजही मिळाले.

वाचा : स्टिव्ह स्मिथला माफ करा – मायकल क्लार्क

ट्रीपल जेने प्रसिद्ध केलेला हा व्हिडिओ पाहता ऑस्ट्रेलियातच आपल्या संघाच्या या कृत्याविषयी खिल्ली उडवण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. या घटनेची कबुली दिल्यानंतर संपूर्ण क्रीडाविश्वातून ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील खेळाडूंवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. त्याशिवाय या प्रकरणात दोषी आढणाऱ्या सर्व खेळाडूंवर कठोर कारवाई होण्याची मागणीही अनेकांनी केली. त्यामुळे आता स्टीव्ह स्मिथ आणि त्याच्या संघातील खेळाडूंच्या भविष्यावर संकटांचं सावट आलं आहे असंच म्हणावं लागेल.