नवी दिल्ली : दुखापतीतून सावरलेले वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल यांचे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात कोणताही मोठा बदल करणे निवड समितीने टाळले. मोहम्मद शमी आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. जायबंदी अष्टपैलू रवींद्र जडेजाला या स्पर्धेला मुकावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला १६ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावर होईल.

बुमरा आणि हर्षल यांना दुखापतींमुळे नुकत्याच झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेला मुकावे लागले होते. मात्र, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) दुखापतींवर उपचार घेतल्यानंतर ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने त्यांना तंदुरुस्त ठरवले आहे. आशिया चषकात निराशा करणाऱ्या आवेश खानने संघातील स्थान गमावले आहे. विश्वचषकासाठी बुमरा,हर्षलसह भुवनेश्वर कुमार आणि डावखुरा अर्शदीप सिंग या वेगवान चौकडीची भारतीय संघात वर्णी लागली आहे.

जडेजा या स्पर्धेला मुकणार असल्याने डावखुरा फिरकीपटू आणि फलंदाजीत सक्षम अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच दीपक हुडानेही संघातील स्थान राखले आहे. यष्टिरक्षक ऋषभ पंतला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये फारसा प्रभाव पाडता आलेला नसला, तरी ऑस्ट्रेलियातील यापूर्वीची त्याची कामगिरी आणि डावखुरेपणा, यामुळे त्याचीही संघात निवड झाली आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघ

* फलंदाज : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार),     विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा

* यष्टिरक्षक : ऋषभ पंत, दिनेश कार्तिक

* अष्टपैलू : हार्दिक पंडय़ा

* फिरकीपटू : रविचंद्रन अश्विन, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल</p>

*वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार,  हर्षल पटेल, अर्शदीप सिंग

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, दीपक चहर, रवी बिश्नोई

अन्य ट्वेन्टी-२० मालिकांसाठी संघनिवड

* ट्वेन्टी-२० विश्वचषकासह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकांसाठीही भारतीय संघाची घोषणा

* ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी दीपक चहर, मोहम्मद शमीचा मुख्य संघात समावेश

* ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी अर्शदीप सिंगला विश्रांती

* दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमारला विश्रांती