भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) पदावर राहुल जोहरी यांची निवड करण्यात आली आहे. याआधी जोहरी हे ‘डिस्कव्हरी’ नेटवर्कच्या दक्षिण-पूर्व आशियाई विभागाचे महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. येत्या १ जूनपासून ते बीसीसीआयच्या सीईओपदाचा कार्यभार स्विकारणार असून, सचिव अनुराग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील कार्यालयातून ते काम पाहतील.
बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी राहुल जोहरी यांचे स्वागत करताना त्यांचा अनुभव आणि ज्ञानाची क्रिकेट बोर्डाला नक्कीच मदत होईल, असे म्हटले आहे. बीसीसीआयच्या कार्यशैलीत सुसूत्रता कायम राखण्यासाठी राहुल जोहरी यांचा दृष्टीकोन, मार्गदर्शन आणि पाठिंबा नक्कीच फायदेशीर ठरेल, असेही मनोहर पुढे म्हणाले.