नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आगामी सत्र २२ मार्चपासून सुरू करण्याचा विचार असून लोकसभा निवडणूक असतानाही ‘आयपीएल’चे आयोजन संपूर्ण देशात करण्यात येणार असल्याचे संकेत ‘आयपीएल’चे अध्यक्ष अरुण धुमल यांनी दिले. देशभरात लोकसभा निवडणुका एप्रिल व मेदरम्यान होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच ‘आयपीएल’च्या १७व्या सत्राचा कार्यक्रम अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवातीला लीगच्या केवळ १५ दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात येणार आहे. उर्वरित सामन्यांचा कार्यक्रम निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर घोषित केला जाईल, असे धुमल म्हणाले. लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा पुढील महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘‘स्पर्धेची सुरुवात २२ मार्चपासून करण्याचा आमचा विचार आहे. आम्ही सरकारी संस्थांसोबत मिळून याबाबत काम करीत आहोत. आम्ही प्रथम सुरुवातीचा कार्यक्रम जाहीर करू. संपूर्ण स्पर्धेचे आयोजन भारतातच केले जाणार आहे,’’ असे धुमल यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, बाळाचं नाव ठेवलं…

यापूर्वी, २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांमुळे ‘आयपीएल’चे संपूर्ण सत्राचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. तर २०१४ मध्ये काही सामने संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे पार पडले होते. यानंतर २०१९ च्या निवडणुकांदरम्यान संपूर्ण लीगचे आयोजन भारतातच झाले होते. जूनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘आयपीएल’चा अंतिम सामना २६ मेला आयोजित केला जाऊ शकतो.

भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत ५ जूनला न्यूयॉर्क येथे आयर्लंडविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. १ जूनला कॅनडा व अमेरिकेदरम्यान होणाऱ्या सामन्याने विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होईल. नियमानुसार ‘आयपीएल’चा उद्घाटनीय सामना गेल्या हंगामातील विजेता व उपविजेता संघांदरम्यान होतो . त्यामुळे गतविजेता चेन्नई सुपर किंग्स व उपविजेते गुजरात टायटन्स यांच्यात सलामीची लढत होऊ शकेल.

आगामी ‘आयपीएल’ हंगामासाठीचा लिलाव गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पार पडला होता. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर या लिलावात ‘आयपीएल’मधील सर्वाधिक बोली लावण्यात आली. त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने २४.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci planning to start ipl 2024 from march 22 says arun dhumal zws