Ben Stokes Record: बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने अफलातून फलंदाजी केली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या स्टोक्सने किवी गोलंदाजांचा समाचार घेत वादळी खेळी केली. त्याने १२४ चेंडूत १८२ धावा केल्या, त्यात १५ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. स्टोक्स हा असा खेळाडू ठरला असता ज्याने इंग्लंडकडून पहिले एकदिवसीय द्विशतक केले असते मात्र, अवघ्या १८ धावांनी हुकले. स्टोक्सला जरी द्विशतक पूर्ण करता आले नसले तरी त्याने मोठा इतिहास रचला आहे. तो इंग्लंडकडून सर्वात जास्त एकदिवसीय धावा करणारा खेळाडू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टोक्सने केलेल्या या १८२ धावा ही इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या फॉरमॅटमध्ये १८० हून अधिक धावा करणारा तो पहिला इंग्लिश क्रिकेटर ठरला आहे. स्टोक्सने जानेवारी २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८० धावांची खेळी करणाऱ्या जेसन रॉयचा विक्रम मोडला आहे. रॉयने त्या सामन्यात १५१ चेंडूंचा सामना केला, ज्यात १६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. इंग्लंडसाठी सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अॅलेक्स हेल्स (१७१) तिसऱ्या, रॉबिन स्मिथ (नाबाद १६७) चौथ्या आणि जोस बटलर (नाबाद १६२) पाचव्या क्रमांकावर आहे.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांना गुडघे टेकायला लावणाऱ्या बेन स्टोक्सने आणखी एक कामगिरी केली आहे. एखादा संघ जेव्हा ऑलआऊट होतो तेव्हा त्यात सर्वाधिक एकदिवसीय धावसंख्या करणारा तो क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने या बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १७५ धावांची खेळी खेळली होती.

बेन स्टोक्सची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या

१८२ – बेन स्टोक्स विरुद्ध न्यूझीलंड, आज

१७५ – सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००९

१७३ – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१६

१६२ – ख्रिस गेल विरुद्ध इंग्लंड, २०१९

१६० – इम्रान नझीर विरुद्ध झिम्बाब्वे, २००७

हेही वाचा: Harmanpreet Kaur: रोहित-विराट नव्हे, हरमनप्रीत कौर ठरली टाइम १०० नेक्स्ट २०२३च्या यादीत स्थान मिळवणारी भारतीय क्रिकेटपटू

सामन्यात काय झाले?

जर या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. डावाच्या पहिल्या चेंडूवर जॉनी बेअरस्टो (०) पॅव्हेलियनमध्ये परतला. जो रूटही (४) फारसे काही करू शकला नाही. दोघेही ट्रेंट बोल्टचे शिकार ठरले. यानंतर स्टोक्स आणि डेव्हिड मलान (९५ चेंडूत ९६ धावा, १२ चौकार आणि एक षटकार) यांनी डाव सावरला. दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी १९८ धावांची भक्कम भागीदारी केली. ही भागीदारी बोल्टने ३१व्या षटकात तोडली. स्टोक्सने ७६ चेंडूत चौथे वन डे शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात जलद शतक आहे. स्टोक्सने कर्णधार बटलर (२४ चेंडूत ३८) सोबतघेत चौथ्या विकेटसाठी ७८ धावा आणि लियाम लिव्हिंगस्टोनला (१३ चेंडूत 11) साथीला घेत पाचव्या विकेटसाठी ४६ धावांच्या दोन छोट्या भागीदारी केल्या.

हेही वाचा: BCCI Selection Committee: बीसीसीआय निवड समितीत होणार बदल, आगरकरांच्या टीममधील सलील अंकोला राजीनामा देण्याच्या तयारीत

स्टोक्स ज्या लयीत होता ते पाहता तो सहज द्विशतक झळकावेल असे वाटत होते. पण बोल्टने ४५व्या षटकात स्टोक्सला बोल्ड केले. बोल्टने ९.१ षटकात ५१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा संघ ४८.१ षटकांत ३८६ धावांत गडगडला. स्टोक्सचे हे एकदिवसीय मालिकेतील पुनरागमन आहे. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी त्याने गेल्या महिन्यात एकदिवसीय फॉर्मेटमधून निवृत्ती मागे घेतली. २०१९ मध्ये इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यात स्टोक्सची महत्त्वाची भूमिका होती. अशा परिस्थितीत आगामी विश्वचषकापूर्वी स्टोक्स जबरदस्त फॉर्मात आहे ही इंग्लंडसाठी आनंदाची बाब आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ben stokes missed double century in odi but created big history first england cricketer to do this feat avw
First published on: 14-09-2023 at 19:13 IST