|| ऋषिकेश बामणे

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटचे ११वे पर्व आता अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पध्रेत आतापर्यंत वयाची तिशी ओलांडलेले खेळाडू एकटय़ाच्या जीवावर सामना जिंकून देण्यात पटाईत असल्याचेच सिद्ध होत आहे.

‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत अव्वल स्थानावर असणारा अंबाती रायडू (३२ वर्षे), शेन वॉटसन (३६), महेंद्र सिंग धोनी (३६) आणि ड्वेन ब्राव्हो (३४) हे चेन्नई सुपर किंग्जच्या यशाचे अनुभवी शिलेदार. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा एबी डी’व्हिलियर्स (३४), किंग्स इलेव्हन पंजाबचा ख्रिस गेल (३८) आणि सनरायजर्स हैदराबादचा शकिब अल हसन (३१) ही मंडळी या यादीत चपखलपणे बसतील. याशिवाय बेंगळूरुचा ब्रेंडन मॅक्क्युलम (३६) आणि हैदराबादचा युसूफ पठाण (३५) यांनीसुद्धा ठरावीक सामन्यांमध्ये आपल्या अनुभवाच्या जोरावर संघाला विजयी केले आहे. सर्वाधिक एकूण धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी सहाव्या स्थानावर आहे, तर वॉटसन आणि डीव्हिलियर्स अनुक्रमे नवव्या व दहाव्या स्थानावर आहेत.

मोक्याच्या क्षणी अनुभवी गोलंदाजांनी जबाबदारीने सुरेख गोलंदाजी केली आहे. ‘पर्पल कॅप’च्या चढाओढीत बेंगळूरुचा ३० वर्षीय उमेश यादव (८ सामन्यांत ११ बळी) आणि पंजाबचा ३१ वर्षीय अँड्रयू टाय (७ सामन्यात ९ बळी ) अनुक्रमे चौथ्या व आठव्या स्थानावर विराजमान आहेत. याशिवाय ब्राव्हो, इम्रान ताहीर, शकिब यांनीही संघासाठी गरजेच्या वेळी उपयुक्त कामगिरी करून दाखवली आहे.

वॉटसन अष्टपैलू खेळाडूंमध्येही अग्रस्थानावर आहे. ८ सामन्यांतून २८१ धावा आणि ६ बळींसह त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम मौल्यवान खेळाडूच्या पुरस्कारासाठी १८५ गुणांसह दावेदारी मजबूत केली आहे.

शतकवीर

यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त दोनच शतके झळकावली गेली असून, गेल आणि वॉटसन यांनी हा पराक्रम करून दाखवला आहे. गेलने हैदराबादविरुद्ध १०४ धावा केल्या होत्या, तर वॉटसनने राजस्थानविरुद्ध १०६ धावांची खेळी साकारली होती. हीच धावसंख्या चालू आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.

सर्वाधिक षटकार

सर्वाधिक षटकार खेचणाऱ्यांच्या यादीत तर पहिले पाचही खेळाडू तिशी ओलांडलेले असून आकडेवारीच त्यांच्या कामगिरीची पोचपावती देते. या यादीत गेलचा पहिला क्रमांक लागतो. यंदाच्या हंगामातील उत्तुंग षटकाराच्या यादीत पहिला आणि तिसरा क्रमांक हा डी’व्हिलियर्सकडे आहे, तर दुसरा क्रमांक धोनीचा आहे.