आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या (एआयबीए) दडपणामुळे बॉक्सिंग इंडियाने (बीआय) बॉक्सिंगपटू सरिता देवीचे पती आणि वैयक्तिक प्रशिक्षक यांच्यावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. इन्चॉन आशियाई क्रीडा स्पध्रेतील लढतींदरम्यान रिंगच्या नजीक अनधिकृतरीत्या हजर राहिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.आशियाई स्पध्रेतील उपांत्य फेरीच्या वादग्रस्त लढतीत पराभूत झाल्यानंतर कांस्यपदक स्वीकारण्यास नकार देणाऱ्या सरिता देवीवर एआयबीएने तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली आहे. आता तिच्यावर आजीवन बंदीची टांगती तलवार आहे. सरिताने नंतर याबाबत माफीसुद्धा मागितली होती. याचप्रमाणे तिची शिक्षा कमी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया यांनी दिली.‘‘नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या अधिवेशनात आम्ही सरिताने पदक नाकारल्याच्या घटनेबाबतची परिस्थिती आणि भूमिका मांडली. यावेळी सरिताचे पती आणि वैयक्तिक प्रशिक्षक यांच्यावर आम्ही कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. त्यांना या स्पध्रेसाठी परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे ते मैदानावर का हजर होते,’’ असा सवाल जजोडिया यांनी यावेळी विचारला.