एच.एस.प्रणॉय आणि परुपल्ली कश्यप या भारताच्या जोडगोळीने कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेची विजयाने सुरुवात केली आहे. या स्पर्धेत दुसरं मानांकन मिळालेल्या प्रणॉयने आपला मेक्सिकन प्रतिस्पर्धी जॉब कास्टिलीओचा २१-१३, २१-१५ असा धुव्वा उडवला. आगामी सामन्यात प्रणॉयसमोर स्कॉटलंडच्या किरेन मेरिलेसचं आव्हान असणार आहे.

प्रणॉयला या स्पर्धेत तुलनेने सोपा ड्रॉ समोर आल्यामुळे या स्पर्धेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. तर दुसरीकडे परुपल्ली कश्यपने बिगरमानांकीत प्रतिस्पर्ध्यावर २१-१५, २१-५ असा विजय मिळवला. पुढील सामन्यात कश्यपसमोर जपानच्या कोकी वाटानाबे याचं आव्हान असणार आहे.

प्रणॉय आणि कश्यपचा अपवाद वगळता भारताच्या अभिषेक येलेगर, सारंग लखानी, करण राजराजन यांनी आपल्या पहिल्या फेरीचे सामने जिंकले आहेत. तिन्ही नवोदीत खेळाडूंनी आपल्यापेक्षा तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना चांगली लढत देत आपले पहिले सामने जिंकले आहेत. भारताच्या हर्षिल दाणी या एकमेव खेळाडूला कॅनडा ओपनच्या पहिल्या फेरीतून माघार घ्यावी लागली आहे.