विश्वनाथन आनंदचा अवतार संपला, अशी टीका करणाऱ्यांना विश्वनाथन आनंदने चोख उत्तर देत विजयाची गुढी उभारली आहे. पाच वेळा जगज्जेता ठरलेल्या भारताच्या विश्वनाथन आनंदने आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद निश्चित केले आहे. १३व्या फेरीअखेर दीड गुणांची आघाडी घेतल्यामुळे आता वर्षअखेरीस होणाऱ्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनसमोर आनंदच आव्हानवीर असणार, यावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले.
या स्पर्धेची एकच फेरी शिल्लक असून आनंद पराभूत झाला तरी त्याचे जेतेपद निश्चित होणार आहे. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनबरोबर पुन्हा विश्वविजेतेपदाची लढत खेळण्याचा मान त्याला मिळणार आहे. कार्लसनने गेल्या वर्षी चेन्नईत आनंदला पराभूत करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती.
आनंदने १३व्या फेरीत सर्जी कार्याकीन याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली. शेवटच्या चालीपर्यंत रंगतदार झालेल्या या लढतीत कार्याकीनने ९१व्या चालीपर्यंत विजय मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ३०व्या चालीला आनंदकडे एक हत्ती, एक घोडा व चार प्यादी तर कार्याकीन याच्याकडे दोन घोडे, एक उंट व चार प्यादी अशी स्थिती होती. मात्र जास्त पावसाळे पाहिलेल्या आनंदने कार्याकीनचे सर्व डावपेच हाणून पाडले. किंबहुना कार्याकीनचे डावपेच त्याच्यावरच उलटणार, असे दिसू लागले होते. अखेर कार्याकीनने अध्र्या गुणावर समाधान मानले.
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लेव्हॉन अरोनियनला दिमित्री आंद्रेकीने पराभवाचा धक्का दिला. चुरशीने झालेल्या या लढतीत आंद्रेकीनने ४३व्या चालीला विजय मिळविला. त्याच्या प्याद्याचे वजिरात रूपांतर झाल्यानंतर अरोनियनने पराभव मान्य केला. या पराभवामुळे विजेतेपद मिळवण्याच्या अरोनियनच्या आशा संपुष्टात आल्या. त्याच्यासह आंद्रेकीन, शाख्रीयर मामेद्यारोव्ह, व्लादिमीर क्रॅमनिक यांचे प्रत्येकी ६.५ गुण झाले आहेत.
क्रॅमनिकने अटीतटीच्या लढतीत व्हेसेलिन टोपालोव्हवर शानदार विजय मिळविला. त्याने ५४व्या चालीत हा डाव जिंकला. टोपालोव्हचे ५.५ गुण आहेत. पीटर स्विडलर व मामेद्यारोव्ह यांच्यातील डाव ४२ चालींमध्ये बरोबरीत सुटला.

१३व्या फेरीतील निकाल
विश्वनाथन आनंद बरोबरी वि. सर्जी कार्याकीन
लेव्हॉन आरोनियन पराभूत वि. दिमित्री आंद्रेकीन
व्लादिमीर क्रामनिक वि. वि. व्हेसेलीन टोपालोव्ह
पीटर स्वेडलर बरोबरी वि. शाख्रीयर मामेद्यारोव्ह
गुणतालिका
१. विश्वनाथन आनंद    ८ गुण
२. व्लादिमीर क्रॅमनिक     ६.५ गुण
३. दिमित्री आंद्रेकीन    ६.५ गुण
४. शाख्रीयर मामेद्यारोव्ह    ६.५ गुण
५. लेव्हॉन अरोनियन      ६.५ गुण
६. सर्जी कार्याकीन     ६.५ गुण
७. पीटर स्विडलर          ६. ० गुण
८. व्हेसेलिन टोपालोव्ह     ५.५ गुण

पुन्हा विश्वविजेता होईन -आनंद
आव्हानवीर स्पर्धेतील एक फेरी शिल्लक असतानाच विजेतेपद निश्चित करून मी पुन्हा मॅग्नस कार्लसनशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालो आहे. या कामगिरीमुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर मिळाले असेल. आता कार्लसन याच्यावर मी निश्चितपणे मात करीन व पुन्हा विश्वविजेता होईन, असे आनंदने विजयानंतर सांगितले.