म्युनिक : बलाढ्य बार्सिलोना संघाला तब्बल १७ वर्षांनंतर प्रथमच चॅम्पियन्स लीग फुटबॉलची उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले.

लिओनेल मेसी पॅरिस सेंट-जर्मेनशी करारबद्ध झाल्यापासून बार्सिलोनाची कामगिरी सातत्याने ढासळत आहे. बुधवारी मध्यरात्री बायर्न म्युनिकने ई-गटातील लढतीत बार्सिलोनाला ३-० अशी धूळ चारली. थॉमस म्युलर (३४वे मिनिट), लेरॉय साने (४३वे मि.) आणि जमाल मुसिआला (६२वे मि.) यांनी बायर्नसाठी प्रत्येकी एक गोल केला. या पराभवामुळे बार्सिलोना संघाची (सहा सामन्यांत सात गुण) गटात तिसऱ्या स्थानी घसरण झाली. तर बायर्न (१८ गुण) आणि बेन्फिका (७ गुण) यांनी आगेकूच केली.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मँचेस्टर युनायटेडला यंग बॉइजने १-१ असे बरोबरीत रोखले. तर गतविजेत्या चेल्सीला झेनिटविरुद्ध ३-३ अशी बरोबरी पत्करावी लागली. मात्र युनायटेड, चेल्सी या संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

उपउपांत्यपूर्व फेरीतील १६ पैकी १५ संघ निश्चित झाले असून गुरुवारी अटलांटा विरुद्ध व्हिलारेयाल लढतीने अखेरचा संघ ठरेल.

लिव्हरपूलचा विजयी षटकार

लिव्हरपूलने सलग सहाव्या विजयाची नोंद करताना प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला. लिव्हरपूलने वर्चस्वपूर्ण कामगिरी कायम राखताना ब-गटात एसी मिलानला २-१ असे नमवले. मोहम्मद सलाह (३६वे मि.) आणि डीव्हॉक ओरिगीने (५५ मि.) लिव्हरपूलसाठी गोल नोंदवले. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत सलाह (७ गोल) तिसऱ्या स्थानी आहे.