गुजरात पहिल्या दिवसअखेर ८ बाद ३००; सिद्धार्थ कौलचे चार बळी

‘‘गेल्या चार वर्षांपासून माझे संघातील स्थान डळमळीत होते. त्यानंतर मला फलंदाजीत तळाच्या क्रमांकावर स्थान मिळाले. सुरुवातीला अपयश आले, पण त्यानंतर मी माझी भूमिका समजून घेतली. तळाच्या फलंदाजांबरोबर खेळताना काय समीकरणे असायला हवीत, हे मी जाणून घेतले. रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीनंतर महेंद्रसिंग धोनीने मला युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. त्यानंतर इराणी चषकात पहिले शतक व्हावे आणि माझ्या शतकाने संघ अडचणीतून बाहेर यावा, यासारखा आनंद तो काय असावा,’’ अशा शब्दांत गुजरातसाठी संकटमोचक ठरलेल्या चिराग गांधीने आपल्या भावना सामन्याच्या पहिल्या दिवसानंतर व्यक्त केल्या. इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत गुजरातचे एकामागून एक फलंदाज बाद होत असताना चिरागने झुंजार नाबाद शतक झळकावले, त्याच्या या खेळीच्या जोरावर शेष भारताविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर गुजरातला ८ बाद ३०० अशी धावसंख्या उभारता आली.

गुजरातने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. पहिल्याच षटकात फॉर्मात असलेला समित गोहेल शून्यावर बाद झाला. त्यानंतर प्रियांक पांचाळ (३०) आणि कर्णधार पार्थिव पटेलसारखे (११) चांगल्या लयीत असलेले फलंदाज बाद ठरावीक फरकाने बाद झाले आणि रणजी विजेता गुजरातचा संघ अडचणीत सापडला होता. शेष भारताचे पंकज सिंग आणि सिद्धार्थ कौल हे दोन्ही गोलंदाज भेदक मारा करत होते. पण चिरागच्या सर्वागसुंदर खेळीने गुजरातवरील संकट दूर केले. आपल्या खास शैलीत सुरुवातीला संयम बाळगणाऱ्या चिरागने स्थिरस्थावर झाल्यानंतर सुंदर फटक्यांचा नजराणा पेश केला. यावेळी त्याला मनप्रीत जुनैजाची (४७) चांगली साथ मिळाली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी रचत संघाला दोनशे धावांच्या समीप पोहोचवले. जुनैजा बाद झाल्यावरही चिरागने आपले फटके म्यान केले नाहीत. वाईट चेंडूंचा पुरेपूर फायदा उचलत त्याने गुजरातची धावसंख्या वाढवत नेली. खासकरून उजव्या यष्टीबाहेरच्या वाईट चेंडूंवर त्याने प्रहार केला. गुजरातचे फलंदाज थोडय़ाफार फरकाने तंबूचा रस्ता धरत असले तरी चिरागने संयतपणे फलंदाजी करत संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा वसा घेतला होता आणि त्यामध्ये तो यशस्वीही ठरला. चिरागने १५९ चेंडूंत १८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद १३६ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली, प्रथम श्रेणी सामन्यातील त्याचे हे पहिले शतक ठरले.

‘‘आम्ही रणजी करंडक जिंकलो आहोत. त्यामुळे या सामन्याचे जास्त दडपण नव्हते. मी मनाप्रमाणे खेळत गेलो आणि धावा होत गेल्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना तळाच्या फलंदाजांबरोबर कसे खेळायचे हे मला चांगलेच माहिती झाले आहे, त्याचाच फायदा मला या खेळीतही झाला,’’ असे चिराग म्हणाला.

शेष भारत संघाकडून कौल आणि सिंग यांनी चांगला मारा केला, खासकरून कौलने. पार्थिव पटेलला त्रिफळाचीत करत त्याने गुजरातला मोठा धक्का दिला. एक झेल पकडण्याच्या प्रयत्नामध्ये त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. पण तरीही त्याने गोलंदाजी करणे सोडले नाही. दुखापतीनंतर गोलंदाजी करताना त्याने दोन बळीही मिळवले.

संक्षिप्त धावफलक

गुजरात (पहिला डाव) : ८८ षटकांत ८ बाद ३०० (चिराग गांधी खेळत आहे १३६, मनप्रीत जुनैजा ४७; सिद्धार्थ कौल ४/७३, पंकज सिंग ४/७७)

 

महाराष्ट्राचा सुवर्णचौकार

पुणे : महाराष्ट्राने चार गटांमध्ये विजेतेपद पटकावित प्रौढांच्या २४ व्या राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. महाराष्ट्राच्या दोन संघांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

४० वर्षांवरील पुरुषांच्या विभागात महाराष्ट्राने अंतिम फेरीत दिल्ली संघावर ३-० अशी मात केली. त्या वेळी त्यांच्याकडून रोहित चौधरी, उपेंद्र मुळ्ये, नितीन तोष्णीवाल यांची चमकदार कामगिरी केली. पुरुषांच्या ५० वर्षांवरील अंतिम फेरीत महाराष्ट्र ‘अ’ संघाने दिल्ली ‘अ’ संघावर ३-० असा सफाईदार विजय मिळविला. त्याचे श्रेय सुनील बाब्रस, विवेक अळवणी व अजय कोठावळे यांच्या चतुरस्र खेळास द्यावे लागेल. पुरुषांच्याच ६० वर्षांवरील गटात प्रकाश केळकर, अविनाश जोशी व जयंत कुलकर्णी यांच्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर महाराष्ट्रास विजेतेपद मिळाले. त्यांनी अंतिम लढतीत पश्चिम बंगाल संघावर ३-० अशी मात केली. महाराष्ट्र ‘अ’ संघाने ६५ वर्षांवरील गटाच्या अंतिम सामन्यात आपल्याच ‘ब’ संघाला ३-२ असे पराभूत केले. मध्य प्रदेशने ७० वर्षांवरील गटाच्या अंतिम फेरीत तामिळनाडूला ३-० असे नमविले. कर्नाटक ‘ब’ संघाने ७५ वर्षांवरील गटात विजेतेपद मिळविले. त्यांनी अंतिम लढतीत आपल्याच ‘अ’ संघाचा ३-१ असा पराभव केला.

महिलांच्या ५० वर्षांवरील गटात मात्र महाराष्ट्राला पश्चिम बंगाल संघाने ३-१ असे हरविले. बंगाल संघाच्या कराबी नैती यांनी एकेरीचे दोन्ही सामनेजिंकून महत्त्वाचा वाटा उचलला. महाराष्ट्राकडून सुहासिनी बाक्रे यांनी एकेरीची एक लढत जिंकून चांगली लढत दिली.