२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या भगव्या जर्सीबद्दलचा संभ्रम अखेरीस संपला आहे. इंग्लंडविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालून बर्मिंगहॅमच्या मैदानावर उतरले. ICC ने यंदाच्या हंगामात Home आणि Away सामन्यांकरता वेगळ्या रंगाची जर्सी घालण्याचा नियम केला आहे. त्यानुसार भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध सामन्यासाठी भगव्या रंगाची जर्सी घालणार आहे.

इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विराटला नवीन जर्सीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विराटने आपल्याला ही जर्सी आवडली असून केवळ एका सामन्याकरता खेळाडू ही जर्सी घालणार असल्यामुळे याला १० पैकी ८ मार्क देईन, असं म्हटलं.

“जर्सीमध्ये केलेला हा बदल केवळ एका सामन्यापुरता असणार आहे, त्यामुळे कोणाचं मन राखायचं म्हणून नाही, पण मला डिजाईन खरंच आवडलं आहे. आगामी काळात रंग बदलेल असं मला वाटत नाही. कारण निळ्या रंगाची जर्सी घालून खेळणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.” विराट पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देत होता.