बाबर आझमची संयमी शतकी खेळी आणि त्याला हारिस सोहेल-मोहम्मद हाफीजने दिलेल्या साथीच्या जोरावर, पाकिस्तानने न्यूझीलंडवर ६ गडी राखून मात केली आहे. या विजयासह पाकिस्तानचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अद्याप कायम आहे. २३८ धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती. मात्र बाबर आझमने सर्वात प्रथम मोहम्मद हाफिज आणि त्यानंतर हारिस सोहेलच्या साथीने भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बाबर आझमने नाबाद १०१ तर हारिस सोहेलने ६८ धावांची खेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडला २३७ धावांवर रोखल्यानंतर पाकिस्तानच्या डावाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर फखार झमान आणि इमाम उल-हक फारशा धावा न करता माघारी परतले. मात्र बाबर आझमने खेळपट्टीवर तळ ठोकत पाकिस्तानच्या धावसंख्येला आकार दिला. त्याने मोहम्मद हाफिजसोबत ६६ तर त्यानंतर हारिस सोहेलसोबत शतकी भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. यादरम्यान मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत बाबरने आपलं शतकही पूर्ण केलं. न्यूझीलंडचे गोलंदाज आज सपशेल अपयशी ठरले. ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

दरम्यान, मधल्या फळीत जिमी निशम आणि कॉलिन डी-ग्रँडहोम या खेळाडूंनी रचलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात २३७ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय पुरता फसला. शाहीन आफ्रिदीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडचा निम्मा संघ ८३ धावांत माघारी परतला होता. मात्र यानंतर निशम आणि डी-ग्रँडहोम यांनी भागीदारी रचत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.

मोहम्मद आमिरने मार्टिन गप्टीलचा त्रिफळा उडवत पाकिस्तानला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. यानंतर त्याचा साथीदार कॉलिन मुनरो शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अनुभवी रॉस टेलर, टॉम लॅथम हे फलंदाजही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकले नाहीत. मात्र एका बाजूने केन विल्यमसनने खेळपट्टीवर तळ ठोकत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शादाब खानच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक सरफराजकडे झेल देऊन तो माघारी परतला. त्याने ४१ धावांची खेळी केली.

या अवघड परिस्थितीनंतर न्यूझीलंडचा संघ १५० धावांचा टप्पा ओलांडतो की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र निशम आणि डी-ग्रँडहोम यांनी संयमी खेळ करत खेळपट्टीवर जम बसवला. मोक्याच्या क्षणी दोन्ही खेळाडूंनी फटकेबाजी करत धावफलक हलता ठेवला. यादरम्यान दोघांनीही आपली अर्धशतकं साजरी केली. संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिल्यानंतर डी-ग्रँडहोम धावबाद होऊन माघारी परतला. मात्र निशमने सँटरनच्या साथीने संघाला २३७ धावांचा टप्पा गाठून दिला. निशमने नाबाद ९७ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने ३, तर मोहम्मद आमिर आणि शाबाद खान यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. न्यूझीलंडचा एक खेळाडू धावबाद झाला.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket world cup 2019 new zealand vs pakistan birmingham psd
First published on: 26-06-2019 at 19:56 IST