पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे फुटबॉल चाहते एक सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू आणि आदर्श म्हणून पाहतात. रोनाल्डोचा जगभरात असंख्य चाहते आहेत. पण खुद्द ख्रिस्तियानो कोणत्या फुटबॉलपटूचा चाहता आहे? या प्रश्नाच्या उत्तरात रोनाल्डोने रिअल माद्रिद क्लबचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांचे नाव घेतले.

रोनाल्डोने नुकतेच एका मुलाखतीत आपण रिअल माद्रिद क्लबचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांचा चाहते असल्याचे सांगितले. एक उत्कृष्ट फुटबॉलपटूसोबतच प्रशिक्षक म्हणूनही मला झिनेदिन आवडतात, असे रोनाल्डो म्हणाला. झिनेदिन यांच्या खेळाचा तर मी चाहता आहेच, पण एक प्रशिक्षक म्हणूनही मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे, असे रोनाल्डो सांगतो. याशिवाय, ते एक व्यक्ती म्हणूनही खूप चांगले आहेत. रिअल माद्रिदच्या प्रशिक्षकपदी त्यांची कारकीर्द अशीच बहरत रहावी आणि आम्हाला त्यांच्या मार्गशनाखाली खेळण्याची संधी वर्षोनुवर्षे मिळत राहावी, असेही तो पुढे म्हणाला. रोनाल्डोने यावेळी झिदान यांच्यासोबतच्या काही क्षणांनाही उजाळा दिला.

यंदाचे वर्षे रोनाल्डोसाठी ऐतिहासिक ठरले आहे. रिअल माद्रिद संघाने यंदाने चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली आणि रोनाल्डोच्या नेतृत्त्वाखाली पोर्तुगाल संघाने यंदा युरोपियन चॅम्पियन्स स्पर्धेवर नावर कोरले. त्यामुळे यंदाचे वर्ष आपल्यासाठी खूप खास असल्याचेही रोनाल्डो म्हणाला. ‘बॅलोन डी ओर’ हा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा सन्मान प्राप्त करण्यासाठी मी माझ्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न केले. यंदाच्या वर्षे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरले. दोन महत्त्वाच्या स्पर्धा जिंकता आल्या, असे रोनाल्डो म्हणाला. पण पुरस्कारासाठी दिली जाणारी मतं ही काही माझ्यावर अवलंबून नाहीत. त्यामुळे तो मलाच मिळाला पाहिजे असा माझा काही आग्रह नाही. पण जर तुम्ही पुरस्कार जिंकण्याच्या इच्छेबाबत मला विचारत असाल, तर नक्कीच हा मानाचा पुरस्कार मला मिळावा, असे मनापासून वाटते. मी खोटं बोलणार नाही, असेही रोनाल्डोने स्पष्ट केले.