गॅरेथ बॅले आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या प्रमुख खेळांडूच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली. गेल्या वर्षी याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डॉर्टमंडने रिअल माद्रिदला नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली होती. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या रिअलचा प्रवास आकस्मिकपणे डॉर्टमंडने संपुष्टात आणला होता. यंदा या पराभवाची परतफेड करण्याची संधी रिअल माद्रिदला मिळाली आणि त्यांनी पहिल्या टप्प्यातील सामन्यात ३-० अशा विजयासह डॉर्टमंडचा धुव्वा उडवला. या विजयासह रिअलने सलग चौथ्यांदा चॅम्पियन्स लीग स्पर्धेत  उपांत्य फेरी गाठण्याच्या दिशेने आगेकूच केली.
विजयाच्या इराद्याने अचूक अभ्यासासह खेळायला उतरलेल्या रिअलला तिसऱ्याच मिनिटाला यश मिळाले. डॅनी कारवाजालच्या पासवर गॅरेथ बॅलेने गोल करत रिअलचे खाते उघडले. २७व्या मिनिटाला इस्कोने शिताफीने गोल करत रिअलची आघाडी वाढवली. ५७व्या मिनिटाला रोनाल्डोने सुरेख गोल करत रिअलची आघाडी भक्कम केली. यंदाच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेतला रोनाल्डोचा हा १४वा गोल ठरला. दोन वर्षांपूर्वी बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सीने १४ गोल करत विक्रम प्रस्थापित केला होता. रोनाल्डोने या विक्रमाची बरोबरी केली. मात्र गोल केल्यानंतर काही वेळातच गुडघ्याच्या दुखापतीमुळे रोनाल्डोला मैदान सोडावे लागले. मात्र ही दुखापत गंभीर नसल्याचे रिअल माद्रिदच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
सामना सुरू होण्यापूर्वी अँजेल डि मारिया दुखापतग्रस्त झाल्याने रिअलला आपल्या डावपेचांत बदल करावे लागले. मात्र तरीही रिअलने बहुतांशी वेळ चेंडूवर नियंत्रण राखत डॉर्टमंडने गोल करण्याची कोणताही संधी न देता दिमाखदार विजय मिळवला.