मनिका बत्रा आणि मौमा दास यांनी शर्थीने झुंज दिली. मात्र गतविजेत्या फेंग तियानवेई आणि यू मेंग्यू जोडीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. त्यामुळे मनिका-मौमा जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र महिला दुहेरीतील हे पहिलेवहिले राष्ट्रकुल पदक ठरले.

राष्ट्रकुलचे ऐतिहासिक सांघिक विजेतेपद मिळवण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मनिकाला या यशाची महिला दुहेरीत पुनरावृत्ती करता आली नाही. फेंग आणि यू मेंग्यू जोडीने मनिका-मौमा जोडीचा ११-५, ११-४, ११-५ असा पराभव केला. मागील चारही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला महिला दुहेरीची अंतिम फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. २०१०मध्ये मौमा आणि पलौमी घाटक जोडीने कांस्यपदक जिंकले होते.

कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाच्या यिंग हो आणि कॅरिन लायने जोडीने भारताच्या सुतिर्था मुखर्जी आणि पूजा सहस्रबुद्धे जोडीचा १५-१३, ११-७, ८-११, ११-७ असा पराभव केला. भारतीय टेबल टेनिसपटू पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीमध्येही पदकासाठी दावेदारी करीत आहेत.

अंचता शरथ कमाल आणि जी. साथीयान यांनी पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. या जोडीने सिंगापूरच्या येव ईन कोईन पँग आणि शाओ फेंग ईथॅन पोह जोडीचा ७-११, ११-५, ११-१, ११-३ असा पराभव केला. हरमीत देसाई आणि सानिल शेट्टी यांनी उपांत्य फेरीतील लढत गमावल्यामुळे त्यांना शनिवारी कांस्यपदकाची लढत खेळावी लागणार आहे.

शरथ-मौमा आणि साथीयान-मनिका जोडीने मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. शरथ-मौमा जोडीने कॅनडाच्या झेन वांग आणि मो झँग जोडीला ११-९, ११-९, ५-११, ११-५ असे नमवले, तर साथीयान-मनिका जोडीने सिंगापूरच्या शुई जी पँग- यिहान झोऊ जोडीचा ११-६, १२-१०, १४-१२ असा पराभव केला. पुरुष एकेरीत शरथने इंग्लंडच्या लिआम पिचफोर्डचा ९-११, १३-११, १०-१२, ११-९, ११-७, ११-९ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. साथीयान आणि हरमीत देसाई यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले. नायजेरियाच्या क्वाड्री अरुणाने देसाईचा ११-९, ११-८, ११-९, ११-८ असा पराभव केला, तर इंग्लंडच्या सॅम्युएल वॉकरने साथीयनचा ११-८, ११-८, १३-११, १७-१५ असा पराभव केला.