क्रिकेट हा जसा फलंदाजांचा खेळ, तसाच कबड्डी हा मैदान गाजवणाऱ्या चढाईबहाद्दरांचा खेळ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुरजित नरवालच्या चढायांनी सोमवारी सर्वाच्या डोळ्यांचे पारणे फिटले. दुसऱ्या सत्रात सुरजीतने प्रतिस्पर्धी संघाचे चक्रव्यूह भेदण्यासाठी मारलेल्या हनुमान उडीला कबड्डीरसिकांनी मनसोक्त दाद दिली. वेग, चापल्य आणि तंदुरुस्ती नसानसांत भिनलेल्या हरयाणाच्या सुरजीतमुळेच दिल्लीला पुणेरी पलटण संघाविरुद्ध आपली ‘दबंग’गिरी दाखवता आली. अखेरच्या मिनिटापर्यंत रंगतदार ठरलेल्या तिसऱ्या दिवशीच्या या सामन्यात दिल्लीने ३५-३१ असा विजय मिळवून आपले खाते उघडले. दुसऱ्या लढतीत सुकेश हेगडेच्या निर्णायक चढाईमुळे तेलुगू टायटन्सने यु मुंबाला ३५-३५ असे बरोबरीत रोखले आणि यजमान संघाची हॅट्ट्रिक नोंदवण्याची संधी हुकली. परंतु तरीही प्रो-कबड्डी लीगच्या गुणतालिकेत सध्या यु मुंबा अव्वल स्थानावर आहे.
दिल्लीच्या सुरजीत आणि काशिलिंग आडकेने सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून गुण घेण्याचा सपाटा लावला. त्यामुळे तिसऱ्या मिनिटालाच दिल्लीने पुण्यावर पहिला लोण चढवला. मग पुण्यावर दुसरा लोण पडणार होता. परंतु एकटय़ा उरलेल्या कालिमुथ्थू बालामहेंद्रनने तीन गुण घेत तो वाचवला. मध्यंतराला दिल्लीकडे (२२-१५) आघाडी होती. दुसऱ्या सत्रात पुण्याच्या जीतेश जोशीने कमाल करीत चढायांमध्ये हमखास गुण घेतले. त्यामुळे पुण्याने दिल्लीवर लोण चढवला. त्यामुळे दिल्ली आणि पुणे संघांतील चढायांचे घमासान पाहायला मिळाले. पुण्याचा कर्णधार वझिर सिंगनेही उत्तम चढाया केल्या. मात्र अखेरीस पुण्याला सलग दुसऱ्या सामन्यात खाते उघडण्यात अपयश आले.
नरवालने २२ चढायांमध्ये सर्वाधिक १३ गुणांची कमाई केली. यापैकी ६ चढाया निष्फळ ठरल्या, तर तीन वेळा त्याची पकड झाली. सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर नरवाल म्हणाला की, ‘‘चढाईपटूंनी आक्रमणाकडे आणि पकडपटूंनी बचावाकडे लक्ष केंद्रित करावे, हीच आमची रणनीती होती. मी आणि आडकेने चांगल्या चढाया केल्या, तर अमित सिंग आणि जसमेर सिंग यांनी अप्रतिम पकडी केल्या. त्यामुळेच दिल्लीला विजय मिळवता आला.’’
दुसऱ्या लढतीत यु मुंबाने पहिल्या सत्रात १९-९ अशी आघाडी घेतल्यामुळे ते आरामात विजय मिळवणार अशी लक्षणे दिसत होती. शब्बीर बापू शरफुद्दीन आणि अनुप कुमार यांनी मुंबईला ही आघाडी मिळवून दिली. परंतु दुसऱ्या सत्रात तेलुगू टायटन्सने यु मुंबावर लोण चढवून सामन्यात चुरस निर्माण केली. अखेरच्या चढाईप्रसंगी यु मुंबाकडे ३५-३२ अशी आघाडी होती. परंतु सुकेश हेगडेने शेवटच्या चढाईत तीन गुण घेत मुंबईच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला. राहुल चौधरीने चढायांचे १२ तर सुकेशने ७ गुणांची कमाई केली. मुंबईकडून शब्बीरने १० आणि अनुपने ९ गुण मिळवले. यु मुंबाच्या रिशांक देवाडिगाच्या डोक्याला पहिल्या सत्रात दुखापत झाली, परंतु तरीही हिंमत न हरता तो खेळला. त्यांचा भरवशाचा खेळाडू जीवा कुमारला मात्र पायाला झालेल्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले.
सुनंदाच्या नावानं ‘वाँग’ भलं
सुनंदा वाँग हे तसं द्विराष्ट्रीय नाव. परंतु ‘प्रो-कबड्डी’च्या व्यासपीठावर ती आत्मविश्वासानं वावरते आहे. आपल्या सौंदर्यानं आणि अदाकारीनं कबड्डीच्या सूत्रसंचालनातील रंगत ती खुबीनं वाढवते आहे. वडील चिनी असल्यामुळे मिश्र नाव असल्याचे ती सांगते. मंत्रा, अर्चना, सिद्धार्थ, दानिश यांच्यासोबत ही दिल्लीची कन्यका स्टार स्पोर्ट्सच्या सूत्रसंचालकांच्या चमूत कार्यरत आहे. ‘‘आतापर्यंत अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे मी सूत्रसंचालन केले आहे. खेळाच्या मैदानावर हे पहिलेच पाऊल आहे. कबड्डी हा खेळच संघर्षमय आहे. ‘प्रो-कबड्डीला लोकप्रिय करण्याचा निर्धार आहे. त्यामुळे माझ्यासाठीसुद्धा हे आव्हान आहे,’’ असे सुनंदा सांगते. याबाबतच्या तयारीविषयी सुनंदा म्हणाली, ‘‘बालपणीपासून कबड्डी या खेळाची मला माहिती होती. पण
‘प्रो-कबड्डी’मध्ये जबाबदारीचे काम असल्यामुळे खेळाचे नियम, पैलू सारे काही समजून घेतले.’’