अव्वल राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेतील महाराष्ट्राच्या कामगिरीची शहानिशा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीसमोर रविवारी पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांतील खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांची झाडाझडती घेण्यात आली. चौकशी समितीच्या अहवालावर चर्चा करून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची कार्यकारिणी समिती या संदर्भात काही दिवसांत निर्णय घेईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे. दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही या वेळी देण्यात आले.
जानेवारी महिन्यात पाटणा (बिहार) येथे झालेल्या ६१व्या अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. महाराष्ट्राच्या संघाच्या कामगिरीची शल्यचिकित्सा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने मग त्रिसदस्यीय समिती नेमली होती. यात कोषाध्यक्ष शांताराम जाधव तसेच संयुक्त सचिव मंगल पांडे आणि सुनील जाधव यांचा समावेश आहे. या समितीने महाराष्ट्राच्या सामन्यांचे व्हिडीओ चित्रण पाहिले होते.
रविवारी दोन्ही संघांचे खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांना शिवाजी पार्क येथील राज्याच्या कचेरीत चौकशी समितीला सामोरे जावे लागले. महाराष्ट्राचे महिला संघाचे प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी अलिबाग येथील भारतीय हौशी कबड्डी असोसिएशनच्या प्रगत पंच शिबिराला हजर राहिले होते. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. साहाय्यक प्रशिक्षक सागर बांदेकर काही अपरिहार्य कारणास्तव हजर राहू शकले नाहीत, तर आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू दीपिका जोसेफ दुखापतीमुळे येऊ शकली नाही. परंतु दोन्ही प्रशिक्षक, व्यवस्थापक आदी मंडळींचे अहवाल राज्य कबड्डी असोसिएशनकडे सादर करण्यात आले आहेत. याशिवाय सर्व खेळाडूंनी रविवारी राज्य असोसिएशनच्या कार्यालयात उपस्थित राहून चौकशी समितीकडे आपली बाजू मांडली, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.