लंडन ऑलिम्पिकमधील वाईट कामगिरीच्या स्मृती मनात अजूनही ताजा असतानाच, आशियाई स्पर्धेत या स्मृती पुसून टाकण्याचे भारताची अव्वल तिरंदाजपटू दीपिका कुमारीचे ध्येय आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिल्यानंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे उद्दिष्ट दीपिका कुमारीने बाळगले आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये दीपिकाकडून पदकाची अपेक्षा बाळगली जात असताना तिला महिलांच्या एकेरी रिकव्‍‌र्ह प्रकारात पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. ‘‘या पराभवाचे शल्य अद्यापही मला बोचत आहे. या चुकांची पुनरावृत्ती करण्याची संधी मला आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे. लंडनमधील कामगिरी माझी आतापर्यंतची सर्वात निराशाजनक कामगिरी ठरली होती. मी त्या दिवशी माझ्या क्षमतेनुसार खेळ करू शकले नव्हते. आता लंडन ऑलिम्पिकनंतर आशियाई स्पर्धा ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. या स्पर्धेत मी माझे सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे,’’ असे दीपिकाने सांगितले.
२०१०च्या गुआंगझाऊ आशियाई स्पर्धेत दीपिकाने सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळवले होते. पण वैयक्तिक प्रकारात तिला कांस्यपदकाने हुलकावणी दिली होती. याविषयी ती म्हणाली, ‘‘आतापर्यंत मी एकाच आशियाई स्पर्धेत सहभागी झाले असून सांघिक कांस्यपदक माझ्या नावावर आहे. पण इंच्योनमध्ये मी वैयक्तिक प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या दडपणाचा सामना कसा करायचा, हे मी शिकले आहे.’’