ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेने निवडणुकीनंतर कार्यकारिणी बदलाचा धर्मादाय कार्यालयाचा दावा सादर केल्यामुळे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेवरील देवराम भोईर यांचे उपाध्यक्षपद संपुष्टात आले आहे, असे स्पष्टीकरण संघटनेचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिले आहे.

ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या १० नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत देवराम भोईर यांचा अध्यक्षपदावर पराभव झाला. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ठाणे जिल्ह्याने धर्मादाय कार्यालयाच्या अहवालासह कृष्णा पाटील, मनोज पाटील आणि योगेश पाटील अशा तीन नव्या नामनिर्देशित सदस्यांची नावे राज्य कबड्डी संघटनेचे घटनेनुसार सादर केली. त्यामुळे भोईर यांचे पद कायदेशीररीत्या रिक्त झाले आहे, असे राज्य संघटनेचे म्हणणे आहे. मात्र भोईर यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. राज्य संघटनेमधील माझे उपाध्यक्षपद शाबूत आहे. मला यासंदर्भात कोणतेही पत्र मिळालेले नाही, असा दावा भोईर यांनी केला आहे.

२०१४मध्ये झालेल्या ठाणे जिल्ह्याच्याच निवडणुकीनंतर रमेश देवाडिकर यांना राज्य कबड्डी संघटनेच्या नियमानुसार आपले पद गमवावे लागले होते. त्यामुळे राज्य कबड्डी संघटनेच्या घटनेत या नियमात बदल करावे, अशी सूचना बऱ्याच कबड्डी संघटकांनी केली होती. जिल्ह्याच्या निवडणुकीनंतरही पदाधिकाऱ्याला कार्यकाळ संपेपर्यंत पद टिकवता येण्यासंदर्भातील नियम प्रत्यक्षात घटनेत नमूद करण्यात आला नाही, अशी माहिती मिळते आहे.

करोनामुक्तीनंतर पोटनिवडणूक!

करोनामुक्तीनंतर उपाध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक घेण्यात येईल, असे आस्वाद पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तूर्तास राज्य कबड्डी संघटनेत जिल्ह्याला प्रतिनिधित्व असावे, म्हणून मनोज पाटील यांनी अस्थायी निमंत्रित सदस्य म्हणून सामावून घेण्यात आले आहे. आगामी पोटनिवडणुकीत ठाण्यालाही उमेदवार उभा करता येईल. तो निवडून आला, तर त्यांचे प्रतिनिधित्व निवडणुकीद्वारे स्पष्ट होईल. अन्यथा, मनोज पाटील यांना सध्याच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपेपर्यंत निमंत्रित सदस्य म्हणून कार्यरत राहता येईल, असे राज्य कबड्डी संघटनेने म्हटले आहे.