डोराडोस क्लबचा तांत्रिक संचालक म्हणून जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे रविवारी मेक्सिकोमध्ये आगमन होताच चाहत्यांकडून त्याचे भव्य स्वागत करण्यात आले.

सुवर्ण देवतेचे स्वागत, धन्यवाद मॅराडोना अशा आशयाचे फलक झळकावत त्याचे कुलीआकॅन विमानतळावर स्वागत करण्यात आले. सर्व चाहत्यांच्या अभिवादनाचा मॅराडोना यांनी स्वीकार केला. मात्र, कुणाशीही संवाद न साधता ते गंतव्य स्थानी रवाना झाले. १९८६ साली मेक्सिकोमध्ये झालेल्या फिफा विश्वचषकात मॅराडोना यांनी त्यांच्या अर्जेंटिना देशाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. त्यामुळे अर्जेंटिनाप्रमाणेच मेक्सिकोतही त्यांचे चाहते मोठय़ा प्रमाणात आहेत. ‘‘मॅराडोना जेव्हा मेक्सिकोसारख्या देशात येऊन खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे मान्य करतो, तेव्हा त्यात अर्थप्राप्तीपेक्षा फुटबॉलच्या प्रसारातील रस अधिक कारणीभूत असतो,’’ असे क्लबचे अध्यक्ष जोस अ‍ॅन्टोनिओ नुनेझ यांनी सांगितले. ‘‘लहानशा क्लबमधूनच मोठे खेळाडू घडण्याची प्रक्रिया होत असते. हे मॅराडोना यांना ज्ञात असल्यामुळेच त्यांनी आमच्या क्लबशी करार केला आहे,’’ असेही जोस यांनी नमूद केले.