पॅरिस : आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिच व अग्रमानांकित कार्लोस अल्कराझने आपली विजय लय कायम राखताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. याच गटात कारेन खाचानोव्ह, नॉर्वेच्या कॅस्पर रुड व जर्मनीच्या आलेक्झांडर झ्वेरेव यांनी आगेकूच केली. महिला गटात चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हा व टय़ुनिशियाची ओन्स जाबेऊर यांनी पुढची फेरी गाठली. पुरुष एकेरीच्या सामन्यात तिसऱ्या मानांकित जोकोव्हिचने पेरुच्या जुआन पाब्लो वारिलासला ६-३, ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोव्हिचने आक्रमक खेळ करताना वारिलासला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही व विजय साकारला. उपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिचसमोर ११व्या मानांकित कारेन खाचानोव्हचे आव्हान असेल. अल्कराझने आपली लय कायम राखताना इटलीच्या लॉरेंझो मुसेट्टीवर ६—३, ६—२, ६—२ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवत उपांत्यफेरीतील आपली जागा निष्टिद्धr(१५५)त केली. खाचानोव्हने इटलीच्या लॉरेंझो सोनेगोला १-६, ६-४, ७-६ (९-७), ६-१ असे नमवले. अन्य सामन्यात चौथ्या मानांकित रुडने चीनच्या झँग झिझेनला ४-६, ६-४, ६-१, ६-४ असे पराभूत करत पुढची फेरी गाठली. तर, झ्वेरेवने १२व्या मानांकित अमेरिकेच्या फ्रान्सेस टिआफोवर ३-६, ७-६ (७-३), ६-१, ७-६ (७-५) असा विजय नोंदवला. महिला गटात मुचोव्हाने एलिना अवानेस्यानवर ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. अनास्तासिया पावलुचेनकोव्हाचे एलिस मर्टेन्सला ३-६, ७-६ (७-३), ६-३ असा पराभव करत आगेकूच केली. अन्य लढतीत, जाबेऊरने सर्बियाच्या ओल्गा डॅनिलोव्हिचला ४-६, ६-४, ६-२ असे नमवले. तर, ब्राझीलच्या बीट्रिज हद्दाद माइआने एकतरिना अलेक्झांड्रोव्हावर ५-७, ६-४, ७-५ अशी मात केली.