सानिया मिर्झाने टेनिस कारकीर्दीत अनेक आनंदाचे क्षण अनुभवले असतील, परंतु दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान हा क्षण तिच्या आयुष्यातला संस्मरणीय क्षण आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याचे तिने पाहिलेले स्वप्न रविवारी प्रत्यक्षात उतरले. मार्टिना हिंगिसच्या सोबतीने खेळताना सानियाने रविवारी डब्ल्यूटीए फॅमिली सर्किट स्पध्रेवर झेंडा रोवला आणि याच जेतेपदासह तिने अव्वल क्रमांकही पटकावला.
याबाबत ती म्हणाली की, ‘‘मला फार आनंद झाला आहे. मी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले. हे यश माझ्यासाठी सर्वस्व आहे. माझे कुटुंब आणि संघ या सर्वाचे हे स्वप्न होते. ते पूर्ण करू शकले, हे मी माझे भाग्य समजते. गेल्या पाच आठवडय़ांत आम्ही सर्वोत्तम खेळ केला. हा माझा सन्मान आहे आणि आशा करते की, अशीच कामगिरी पुढेही कायम राखण्यात यश मिळेल.’’
सानियाने हिंगिससह सलग तीन स्पर्धामध्ये जेतेपद पटकावले आहे, परंतु त्याचा आनंद उपभोगण्याचा वेळ या जोडीकडे नाही. हैदराबादमध्ये होणाऱ्या फेड चषक स्पध्रेसाठी सानिया  सज्ज झाली आहे. याबाबत सानिया म्हणाली की, ‘‘ मी सरावाला जोमाने सुरुवात केली आहे. आता फेड चषक जिंकायचा आहे आणि नऊ वर्षांनंतर हैदराबादमध्ये मी खेळणार आहे. मला आता बॅग भरून हैदराबाद गाठायचे आहे. त्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी वेळ नाही.’’
हिंगिसबाबत सानिया म्हणाली की, ‘‘ती सर्वोत्तम खेळाडू आहे. माझ्या कठीण प्रसंगी तिने मला सहकार्य केले आणि माझ्या चुकांवर अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी मार्गदर्शन केले. एक चांगला सहकारी असायला भाग्य लागते. आमची सुरुवातच चांगली झाली आणि आशा करते की, यामध्ये सातत्य राहील.’’

फेड चषक स्पध्रेत सानियाकडे भारताचे नेतृत्व
हैदराबाद : मंगळवारपासून सुरू होणाऱ्या फेड चषक टेनिस स्पध्रेत भारतीय संघाचे नेतृत्व दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या सानिया मिर्झाकडे सोपविण्यात आले आहे. या स्पध्रेत भारतासह, इंडोनेशिया, इराण, कझाकस्तान, मलेशिया, ओमान, पॅसिफिक ओशियन, पाकिस्तान, फिलिपाइन्स, सिंगापूर, श्रीलंका आणि तुर्कमेनिस्टान यांचा सहभाग आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सानिया करणार असून एकेरीत तिचा खेळ कसा होतो, हे पाहण्याची उत्सुकता सर्वाना आहे. सानियासह संघात अंकिता रैना, नताशा पल्हा व प्रार्थना ठोंबरे यांचा समावेश आहे.

अव्वल स्थानावर अधिकृत मोहोर
पीटीआय, नवी दिल्ली
दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडूचा मान सानिया मिर्झाने रविवारी पटकावला. मात्र, सोमवारी डब्ल्यूटीएने जाहीर केलेल्या क्रमवारीनंतर त्यावर अधिकृत मोहोर उमटली.
 मार्टिना हिंगिससोबत खेळताना सानियाने डब्ल्यूटीए फॅमिली सर्कल चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सानिया-हिंगिस जोडीने अंतिम लढतीत कॅसा डेलाअ‍ॅक्वा आणि दारिजा जुरॅक जोडीचा ६-०, ६-४ असा धुव्वा उडवला. या जेतेपदासह सानियाने ४७० गुणांची कमाई केली. याआधी लिएण्डर पेस आणि महेश भूपती यांनी पुरुष दुहेरीत अव्वल स्थान मिळवले होते. ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारी सानिया पहिली भारतीय महिला टेनिसपटू आहे.

०३ सानिया आणि हिंगिस जोडीने सलग तिसरे जेतेपद पटकावले असून या जोडीचा अद्याप एकदाही पराभव झालेला नाही. इंडियन वेल्स, मियामीपाठोपाठ चार्ल्सटन स्पर्धा जिंकत सानिया-हिंगिस जोडीने जेतेपदाची हॅट्ट्रिक केली.

१४ जबरदस्त कामगिरीसह सानिया-हिंगिस जोडी वर्षअखेरीस होणाऱ्या फायनल्स स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. गेल्या १४ सामन्यांत केवळ तीनच सेट्स सानिया- हिंगिस जोडीने गमावले.