इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने २०१९ साली मायदेशात झालेल्या विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी यासारख्या प्रगत राष्ट्रांनाही करोना विषाणूचा फटका बसला आहे. सध्याच्या काळात वैद्यकीय यंत्रणा आणि डॉक्टर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. इंग्लंडच्या संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने, आपली अंतिम सामन्यातल्या जर्सीचा लिलाव करुन त्यातून मिळालेला पैसा हा लंडन येथील रॉयल ब्रॉम्प्टन आणि हॅरफिल्ड या दोन रुग्णालयांना दिला आहे. लिलावाच्या माध्यमातून बटलरने अंदाजे ६५ हजार १०० पाऊंड (अंदाजे ६१ लाख रुपये) इतका निधी जमा केला आहे.

बटलरच्या जर्सीसाठी तब्बल ८२ जणांनी आपली बोली लावली होती. सध्याच्या खडतर काळात आपल्या जर्सीने रुग्णालयांना आर्थिक मदत मिळवून देण्यात हातभार लागला याबद्दल बटलरने आनंद व्यक्त केला. २०१९ साली लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात सुपरओव्हरमध्ये इंग्लंडला विजेतेपद मिळवता आलं नव्हतं. अखेरीस सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विजेतेपद बहाल करण्यात आलं होतं. आयसीसीच्या या निर्णयावर त्यादरम्यान बरीच टिकाही झाली होती. अखेरीस आयसीसीने या निमांमध्ये बदल करत सर्वाधिक चौकारांचा निकष काढून टाकला आहे.