* अमित मिश्राच्या हॅट्ट्रिकसह हैदराबादचा सनसनाटी विजय
* पुण्याचा ११ धावांनी लाजिरवाणा पराभव
सामनावीर : अमित मिश्रा
विजयासाठी केवळ १२० धावांचे माफक आव्हान असताना पुणे वॉरियर्स सहज विजय मिळविणार असे वाटले होते. मात्र अमित मिश्रा याने सामन्याच्या १९ व्या षटकांत हॅट्ट्रिकसह चार बळी घेत हैदराबाद सनराइजला सनसनाटी विजय मिळवून दिला. आयपीएल स्पर्धेत मिश्रा याने स्वत: ची तिसरी हॅट्ट्रिक नोंदविली. त्याआधी भुवनेश्वरकुमार (३/१८) व राहुल शर्मा (२/२१) यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे हैदराबादचा डाव २० षटकांत ८ बाद ११९ धावांमध्ये रोखला गेला होता मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी पुण्याच्या फलंदाजांनी केलेल्या आत्मघातकी खेळाचा पुरेपूर फायदा उठविला आणि एक वेळ अशक्य वाटणारी विजयश्री खेचून आणली. त्यांनी पुण्याचा डाव १९ षटकांत १०८ धावांमध्ये गुंडाळला. कर्णधार अँजेलो मॅथ्युज याची शेवटच्या षटकांमधील २० धावांची खेळीही पुण्यास तारू शकली नाही.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा कर्णधार अँजेलो मॅथ्युज याचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरविला. दुसऱ्याच षटकांत अशोक दिंडा याने क्विन्टॉन डी कॉक याला बाद करीत हैदराबादला पहिला धक्का दिला. भुवनेश्वरकुमार याने हैदराबादचे कंबरडेच मोडले. त्याच्या दुसऱ्या षटकांत पहिल्या चार चेंडूंमध्ये पार्थिव पटेल याने दोन चौकारांसह १० धावा वसूल केल्या. मात्र याच षटकांत भुवनेश्वरकुमारने पाचव्या चेंडूवर पटेल (१२) व त्यापाठोपाठ कर्णधार कॅमेरुन व्हाईट (०) यांचा त्रिफळा उडवीत हैदराबादला आणखी एक धक्का दिला. त्याने स्वत:च्या पुढच्या षटकात हनुमा विहारी याला बाद करीत हैदराबादची ४ बाद १७ अशी अवस्था केली. करण शर्मा व बिपलाब समंतराय यांनी २६ चेंडूंमध्ये २४ धावांची भर घातली नाही तोच राहुल शर्मा याने करणला बाद करीत ही जोडी फोडली. पाठोपाठ मिचेल मार्शच्या षटकात थिसारा परेरा हा केवळ २ धावांवर बाद झाल्यानंतर हैदराबादची ६ बाद ४४ अशी स्थिती झाली.
 तथापि समंतराय व अमित मिश्रा यांनी वरिष्ठ फलंदाजांना धावा कशा मिळवायच्या याचा पाठ शिकविताना २६ चेंडूंमध्ये ३१ धावा जमविल्या. समंतरायने ३७ चेंडूंमध्ये तीन चौकार व एक षटकारासह ३७ धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या आशिष रेड्डी याच्या साथीत आत्मविश्वासाने खेळ करीत मिश्राने २९ चेंडूंत ४० धावांची भर घातली. त्यामुळेच त्यांच्या संघास तीन आकडी धावसंख्या गाठता आली. मिश्राने सहजसुंदर फटकेबाजी करीत २४ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. रेड्डी याने एक षटकारासह नाबाद १९ धावा केल्या. रॉबिन उथप्पा (४ चौकारांसह २२) व एरॉन फ्लिंच (३ चौकारांसह १६) यांनी आक्रमक खेळ करीत केवळ ४.२ षटकांत ३८ धावा जमविल्या. ही जोडी मोठी भागीदारी रचणार असे वाटत असतानाच थिसारा परेरा याने स्वत:च्या पहिल्याच षटकात उथप्पा व फ्लिंच यांना बाद करीत वॉरियर्सच्या डावास खिंडार पाडले. पाठोपाठ तिरुमलासेटी सुमन (१२) हा खेळपट्टीवर स्थिरावण्यापूर्वीच तंबूत परतला. त्यावेळी पुण्याची ३ बाद ५७ अशी स्थिती होती. त्यानंतर मॅथ्युज व स्टीव्हन स्मिथ यांनी २९ धावांची भर घातली. उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात स्मिथ १७ धावांवर बाद झाला. मिचेल मार्शने एक चौकार व एक षटकार मारून चांगली सुरुवात केली मात्र डेल स्टेनच्या षटकांत तो १४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ अभिषेक नायर हा परेराच्या षटकांत शून्यावर बाद झाल्यामुळे खेळांत रंगत निर्माण झाली.अमित मिश्राची तिसरी हॅट्ट्रिक! सामन्याच्या १९ व्या षटकांत फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याने शेवटच्या षटकांत चार बळी घेत संघास सनसनाटी विजय मिळवून दिला. त्याने दुसऱ्या चेंडूंवर मॅथ्युजला बाद करीत विजयातील अडसर दूर केला. त्यानंतर चौथ्या चेंडूंवर भुवनेश्वरकुमार याला पायचित केले. पाचव्या चेंडूवर राहुल शर्माचा त्रिफळा उडविला व शेवटच्या चेंडूंवर अशोक दिंडा याचाही त्रिफळा उडवित हॅटट्रिक पूर्ण केली.मिश्राने या षटकांत केवळ दोन धावा दिल्या. त्याची आयपीएलमधील तिसरी हॅट्ट्रिक आहे. यंदाची या स्पर्धेतील दुसरी हॅट्ट्रिक आहे. यापूर्वी सुनील नरेन याने हॅट्ट्रिक केली होती.

संक्षिप्त निकाल
हैदराबाद सनराइज : २० षटकांत ८ बाद ११९ (क्विन्टान डी कॉक २, पार्थिव पटेल १०, कॅमेरून व्हाइट ०, हनुमा विहारी १, बिपलाब समंतराय ३७, करण शर्मा ७, थिसारा परेरा २, अमित मिश्रा ३०, आशिष रेड्डी नाबाद १९, डेल स्टेन नाबाद ४, भुवनेश्वरकुमार ३/१८, राहुल शर्मा २/२१, अशोक दिंडा १/२५, मिचेल मार्श १/२६)
पुणे वॉरियर्स-१९  षटकांत  सर्वबाद १०८ (रॉबिन उथप्पा २२, एरॉन फ्लिंच १६, तिरुमलासेटी सुमन १२, अँजेलो मॅथ्युज २०  ,स्टीव्हन स्मिथ १७, मिचेल मार्श १७, अभिषेक नायर ०,भुवनेश्वरकुमार ०, राहुल शर्मा ०, अशोक िदडा ०, मनीष पांडे नाबाद ७, अमित मिश्रा ४/१९,थिसारा परेरा ३/२०, डेल स्टेन १/३४, इशांत शर्मा १/२२,करण शर्मा १/१३)

गहुंजे स्टेडियमवरुन
स्टेडियमजवळील वस्त्यांमध्ये दिवाळी!
स्टेडियम परिसरात असलेल्या छोटय़ा छोटय़ा वस्त्यांमधील लोकांना गहुंजे येथील सामन्यांमुळे फावल्या वेळेत कमाई करण्याची चांगली संधी मिळाली आहे. घराभोवती असलेल्या अंगणात वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन त्याद्वारे उत्पन्न मिळविण्याची कल्पकता येथील रहिवाशांनी दाखविली आहे. स्टेडियमजवळ वाहन पार्किंगची मर्यादा आहे, तसेच सामना संपल्यानंतर तेथून वाहन काढताना खूप वेळ लागत असल्यामुळे अनेक प्रेक्षक अशा वस्त्यांमध्येच गाडी लावण्यास प्राधान्य देत आहेत. दुचाकीसाठी १० ते २० रुपये तर चार चाकी वाहनांकरिता २० ते ४० रुपये असे वाहन भाडेशुल्क आकारले जात आहे.
प्रेक्षकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा!
पुण्यात कडक उन्हाळा असल्यामुळे व स्टेडियमच्या निम्म्या भागात आच्छादन नसल्यामुळे प्रेक्षकांना चक्कर येण्याच्या घटना घडू शकतात. तसेच अतिउत्साहापायी पायऱ्यांवरुन सटकण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊनच स्टेडियममध्ये ४० वैद्यकीय बूथ ठेवण्यात आले आहेत. तेथे प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याखेरीज स्टेडियम परिसरात सात रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. मुख्य पॅव्हेलियनमध्ये अतिदक्षता विभाग असलेल्या दोन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
बंदोबस्तात वाढ!
बोस्टन मॅरेथॉनचे वेळी झालेले बॉम्बस्फोट व बंगळुरु येथे बुधवारी सकाळी झालेला एलपीजी सिलेंडरचा स्फोट लक्षात घेऊन येथे स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात होती. चिअरगर्ल्सची लोकप्रियता!चिअरगर्ल्स प्रत्येक चौकार किंवा षटकार गेला की चिअरगर्ल्सवर प्रक्षेपणाचा कॅमेरा मारला जात असल्यामुळे त्यांच्याबरोबरच आपलीही छबी दिसावी याकरिता काही प्रेक्षक चिअरगर्ल्सच्या मागे असलेल्या गॅलरीतील जागा पटकाविण्यासाठी धडपडत होते.

कॅमेरून व्हाइट, हैदराबाद सनराजर्सचा कर्णधार
हा सामना जिंकणार असे आम्हाला वाटतही नव्हते. विशेषत: आमचा डाव १२० धावांपूर्वीच रोखला गेल्यानंतर आमच्यापुढे पराभव दिसत होता मात्र मिश्राने मॅथ्युजला बाद केल्यानंतर आमचा आत्मविश्वास उंचावला. त्याचे हे षटक नाटय़मय व सामन्याचा निकाल बदलून टाकणारे ठरले.