भारताची आघाडीची खेळाडू द्रोणावल्ली हरिकाला ‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत नातालिया पोगोनिनाने बरोबरीत रोखले. त्यामुळे या फेरीच्या अखेरीस ३.५ गुणांसह तिला अन्य तीन महिला खेळाडूंसोबत संयुक्त दुसरे स्थान प्राप्त झाले. दिव्या देशमुखने मात्र विजयाची नोंद केली.

तिसऱ्या पटावर, दोन वेळच्या रशियन विजेत्या पोगोनिनाविरुद्ध हरिकाने आक्रमक सुरुवात करत महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. मात्र, काही चुकीच्या चाली रचल्याने तिचा विजय हुकला. तिने आतापर्यंत या स्पर्धेत दोन विजय मिळवले असून तिचे तीन सामने बरोबरीत सुटले आहेत. भारताची युवा खेळाडू दिव्याने लॅटवियाच्या मदारा गोलस्तावर ४९ चालींमध्ये मात केली.

आर. वैशाली आणि वंतिका अगरवाल यांना अनुक्रमे सलोमे मेलिया (जॉर्जिया) आणि झाँसाया अब्दुमलिक (कझाकस्तान) यांनी बरोबरीत रोखले. पद्मिनी राऊतला पराभव पत्करावा लागला. पुरुषांमध्ये ग्रँडमास्टर के. शशिकिरणने व्लादिमिर फेदोसीव्हला धूळ चारली.