राउरकेला : ब्लेक गोव्हर्सने नोंदवलेल्या चार गोलच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेला ९-२ अशी धूळ चारत विश्वचषक हॉकी स्पर्धेत अ-गटातून थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता त्यांची गाठ मलेशिया आणि स्पेन यांच्यातील विजेत्या संघाशी २४ जानेवारीला पडणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयात गोव्हर्सने पेनल्टी स्ट्रोकसह नोंदवलेल्या चार गोलचा प्रमुख वाटा होता. त्याने चौथ्या, १५, १९ आणि २०व्या मिनिटाला गोल केले. यात एक गोल कॉर्नर, तर एक स्ट्रोकवर गोल होता. ऑस्ट्रेलियासाठी अन्य गोल टॉम क्रेग (१०व्या मि.), जॅक हार्वी (२२व्या मि.), डॅनिएल बिल (२८व्या मि.), जेरेमी हेवर्ड (३२व्या मि.) व टीम ब्रँड (४७व्या मि.) यांनी केले. दक्षिण आफ्रिकेसाठी एनटुली एन्कोबिले (आठव्या मि.) आणि कॉक टेव्हिन (५८व्या मि.) यांनी गोल केले. अ-गटातील अन्य सामन्यात अर्जेटिनाने अखेरच्या मिनिटाला गोल करून फ्रान्सला ५-५ असे बरोबरीत रोखले. अर्जेटिना दुसऱ्या स्थानावर राहिले. अखेरच्या मिनिटाला व्हिक्टर चार्लेटने स्ट्रोकवर गोल करून फ्रान्सला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, पुढच्या काही सेकंदांत अर्जेटिनाने चार कॉर्नर मिळवले आणि अखेरच्या सेकंदाला डेल्ला टोरेने कॉर्नर सत्कारणी लावताना अर्जेटिनाला बरोबरी साधून दिली. फ्रान्सकडून चार्लेटने चार, तर टिनेवेज एन्टिनेने एक गोल केला. अर्जेटिनासाठी टोरेने तीन, तर किनन निकोलस, फेरेरोने एकेक गोल केला. दुसरीकडे, बेल्जियमने जपानचा ७-१ असा पराभव केला. या विजयासह बेल्जियमने ब-गटातून अव्वल स्थान मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ब-गटातील अन्य सामन्यात जर्मनीने कोरियावर ७-२ अशी मात केली.