भारत-द. आफ्रिका क्रिकेट मालिका

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेकडे पाहात आहे. रविवारी सुरू होणाऱ्या या मालिकेत गुणी युवा खेळाडूंसह संघबांधणी करण्याचे उद्दिष्ट त्याच्यापुढे असेल.

एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत गारद होणाऱ्या भारताने वेस्ट इंडिजमधील ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले होते. परंतु आता खरी लढाई क्विंटन डी कॉक आणि कॅगिसो रबाडाच्या दक्षिण आफ्रिकेशी असेल. हा खडतर संक्रमण काळातून जात आहे. रबाडाची भन्नाट गोलंदाजी किंवा डेव्हिड मिलरची आक्रमक फलंदाजी भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकेल. फॅफ डय़ू प्लेसिस किंवा हशिम अमला यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंच्या अनुपस्थितीत कसोटी विशेषज्ञ टेंबा बव्हुमा किंवा अ‍ॅनरिच नॉर्जे आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतील.

यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा नेहमीच ऐरणीवर असते. परंतु राष्ट्रीय निवड समितीप्रमाणे संघ व्यवस्थापन मात्र धोनीपलीकडे गांभीर्याने पाहू शकलेले नाही. कारण उदयोन्मुख यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा विश्वास संपादन करता आलेला नाही.

योग्य धडा मिळाल्याची कोहलीकडून कबुली

महेंद्रसिंह धोनीसोबतचे ‘ट्वीट’ भारताचा कर्णधार विराट कोहलीने समाजमाध्यमांवर टाकल्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगू लागल्या. प्रामाणिकपणे व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचा चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जातो, हा योग्य धडा मिळाल्याची ग्वाही कोहलीने दिली आहे. २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील मोहालीच्या उपांत्यपूर्व सामन्यासंदर्भातील हे छायाचित्र कोहलीने टाकले होते. या सामन्यात कोहलीने नाबाद ८२ धावा केल्या, तर धोनीने नाबाद १८ धावा केल्या. या जोडीचे सामन्यातील धावून धावा काढण्याचे तंत्र पाहण्याजोगे होते.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन (उपकर्णधार), टेंबा बव्हुमा, ज्युनियर डाला, बोर्न फॉटर्य़ून, ब्यूरॅन हेन्ड्रिक्स, डेव्हिड मिलर, अ‍ॅनरिच नॉर्जे, अँडिले फेहलुकयावो, ड्वेन प्रीटोरियस, कॅगिसो रबाडा, ताबारेझ शाम्सी, जॉर्ज लिंडे.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, सिलेक्ट १.