श्रीलंका-इंग्लंड कसोटी मालिका

झुंजार फलंदाज अँजेलो मॅथ्यूज (८८) बाद झाल्यामुळे श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडला आहे. जॅक लीचच्या प्रभावी फिरकीमुळे इंग्लंडच्या संघाचे पारडे जड दिसत असले तरी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. विजयासाठी ३०१ धावांचे आव्हान स्वीकारलेल्या श्रीलंकेची मदार मॅथ्यूजवर अवलंबून होती. मात्र चहापानानंतर पहिल्याच षटकात मोईन अलीने त्याला पायचीत केले. मग लीचने दिलरुवान परेराला बाद केले आणि श्रीलंकेची दुसऱ्या डावात ७ बाद २२६ अशी अवस्था झाली असताना पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवावा लागला.

श्रीलंकेचा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ असा पिछाडीवर असून, रविवारी अखेरच्या दिवशी त्यांना विजयासाठी ७५ धावांची आवश्यकता आहे. मात्र त्यांचे फलंदाज शिल्लक आहेत. निरोशान डिक्वेला २७ धावांवर खेळत आहे. लीचने ७३ धावांत ४ बळी घेतले, तर मोईनने दोन बळी घेत त्याला उत्तम साथ दिली.

श्रीलंकेची ३ बाद २६ अशी अवस्था झाली असताना माजी कर्णधार मॅथ्यूजने संघाचा डाव सावरला. त्याने रोशन सिल्व्हा (३७) सोबत पाचव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. डावखुरा सलामीवीर दिमूथ करुणारत्नेने ५७ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : २९०

श्रीलंका (पहिला डाव) : ३३६

इंग्लंड (दुसरा डाव) : ८०.४ षटकांत सर्व बाद ३४६ (जो रूट १२४, बेन फोक्स ६५, अकिला धनंजया ६/११५)

श्रीलंका (दुसरा डाव) : ६५.२ षटकांत ७ बाद २२६ (अँजेलो मॅथ्यूज ८८, दिमूथ करुणारत्ने ५७; जॅक लीच ४/७३)