scorecardresearch

FIFA World Cup 2022 : फ्रान्सची पुन्हा विश्वविजेतेपदाकडे कूच

फ्रान्सने बुधवारी मध्यरात्री झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत लढवय्या मोरोक्कोचे आव्हान २-० असे परतवून लावले.

FIFA World Cup 2022 : फ्रान्सची पुन्हा विश्वविजेतेपदाकडे कूच

उपांत्य फेरीत लढवय्या मोरोक्कोवर मात; थिओ हर्नाडेझ, रँडल मुआनी यांचे गोल

वृत्तसंस्था, अल खोर : फ्रान्सच्या संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच राखण्याच्या दिशेने कूच केली आहे. फ्रान्सने बुधवारी मध्यरात्री झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत लढवय्या मोरोक्कोचे आव्हान २-० असे परतवून लावले. पूर्वार्धात थिओ हर्नाडेझ (पाचव्या मिनिटाला), तर उत्तरार्धात रँडल कोलो मुआनी (७९व्या मि.) यांनी फ्रान्ससाठी निर्णायक गोल नोंदवले.

गतविजेत्या फ्रान्सला यंदाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी फ्रान्सच्या करीम बेन्झिमा, एन्गोलो कान्टे आणि पॉल पोग्बा यांसारख्या काही प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या. त्यामुळे त्यांना विश्वचषकाला मुकावे लागले. मात्र, अन्य खेळाडूंनी आपला खेळ उंचावत फ्रान्सला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले आहे. आता रविवारी होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत फ्रान्सपुढे लिओनेल मेसीच्या अर्जेटिनाचे आव्हान असेल.

मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात फ्रान्सने आपल्या शिस्तबद्ध आणि सांघिक खेळाचे दर्शन घडवले. या सामन्यात मोरोक्कोने ६२ टक्के वेळ चेंडू आपल्याकडे राखला. मात्र, फ्रान्सने भक्कम बचाव करताना त्यांना गोलच्या फारशा संधी निर्माण करू दिल्या नाहीत.  दुसरीकडे, फ्रान्सने संधी मिळताच त्यावर गोल केले.

सामन्याच्या पाचव्या मिनिटाला फ्रान्सचा बचावपटू राफाएल वरानने मोरोक्कोच्या कक्षात मुसंडी मारली. त्यानंतर त्याने अ‍ॅन्टोन ग्रीझमनला अचूक पास दिला. मग ग्रीझमनने गोलकक्षात धावत आलेल्या किलियन एम्बापेकडे चेंडू दिला. मात्र, मोरोक्कोच्या बचावपटूंनी त्याच्या भोवती जात एम्बापेने मारलेला फटका अडवला. परंतु, चेंडू मोरोक्कोच्या बचावपटूच्या अंगाला लागून गोलपोस्टच्या डावीकडे उभ्या थिओ हर्नाडेझकडे गेला. हर्नाडेझने कोणतीही चूक न करता गोल करून फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. यानंतर मोरोक्कोने सामन्यात पुनरागमनाचे प्रयत्न सुरू केले. ओनाहीने मारलेला फटका फ्रान्सचा कर्णधार व गोलरक्षक ह्युगो लॉरिसने अडवला. त्यानंतर ४४व्या मिनिटाला मोरोक्कोच्या एल यामिकने ‘ओव्हरहेड किक’च्या साहाय्याने मारलेला फटका गोलपोस्टला लागला. त्यामुळे फ्रान्सची आघाडी कायम राहिली.

उत्तरार्धात एन नेसरी आणि सोफिएन बोफाल यांना वरान आणि इब्राहिमा कोनाटे या फ्रान्सच्या बचावपटूंनी गोल करण्यापासून रोखले. ७९व्या मिनिटाला उस्मान डेम्बेलेच्या जागी रँडल मुआनीला मैदानावर उतरवण्याचा फ्रान्सने निर्णय घेतला. पुढील मिनिटालाच मुआनीने गोल करत फ्रान्सची आघाडी दुप्पट केली. एम्बापेने मारलेला फटका मोरोक्कोच्या बचावपटूच्या पायाला लागून गोलपोस्टच्या अगदीच शेजारी उभ्या मुआनीकडे गेला आणि त्याने गोल नोंदवला.

गतविजेत्या फ्रान्सने यंदाही अंतिम फेरी गाठली. तब्बल २० वर्षांनी एखाद्या संघाला सलग दोन विश्वचषक स्पर्धामध्ये अंतिम फेरीचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. यापूर्वी २००२मध्ये ब्राझीलने अशी कामगिरी केली होती.

फ्रान्सने चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. फ्रान्सचा संघ यापूर्वी १९९८, २००६, २०१८च्या स्पर्धेत अंतिम सामन्यात खेळला होता.

विश्वचषकातील सामन्यात मध्यंतराला आघाडीवर असताना फ्रान्सने एकदाही पराभव पत्करलेला नाही. मध्यंतराच्या आघाडीनंतर फ्रान्सने २६ सामने जिंकले असून त्यांचा एक सामना बरोबरीत संपला.

बदली खेळाडू म्हणून मैदानावर आल्यानंतर फ्रान्सच्या मुआनीने ४४ सेकंदांतच गोल केला. विश्वचषकात बदली खेळाडूने केलेला हा तिसरा सर्वांत वेगवान गोल ठरला.

मेसीला रोखण्याचे आव्हान -डेशॉम्प

विश्वचषकाचे जेतेपद राखण्यासाठी फ्रान्सला अंतिम सामन्यात अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीला रोखावे लागेल, असे मत फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर डेशॉम्प यांनी व्यक्त केले. ‘‘मेसीने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या विश्वचषकातही आम्ही मेसीविरुद्ध खेळलो होतो. त्या वेळी तो आघाडीपटू म्हणून खेळत होता. मात्र, या वेळी आक्रमणात त्याची भूमिका वेगळी असेल. आम्हाला त्याला रोखावे लागेल. अर्जेटिनाचेही आमच्या काही खेळाडूंना रोखण्याचे लक्ष्य असेल,’’ असे डेशॉम्प म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या