अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजीचं मोठं आव्हान परतवून लावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. तिसऱ्या टी-२० सामन्यात १२ धावांनी बाजी मारत कांगारुंनी टी-२० मालिकेचा शेवट गोड केला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. परंतु दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेत आश्वासक खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. परंतु आगामी कसोटी सामन्यात या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर त्याला स्थान मिळणार की नाही यावर कर्णधार विराट कोहली यानं स्पष्टीकरण दिलं आहे.

हार्दिकचा संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून विचार करण्यासाठी त्याला सातत्यानं गोलंदाजीही करण्याची करण्याची गरज असल्याचं कोहली म्हणाला. पांड्यानं पहिल्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे ९० आणि ९२ धावा केल्या होत्य़ा. याव्यतिरिक्त त्यानं टी-२० सामन्यांमध्येही उत्तम कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला मालिकावीर म्हणूनही घोषित करण्यात आलं होतं.

दरम्यान, आगामी कसोटी सामन्यांमध्ये पांड्याला फलंदाज म्हणून उतरवलं जाईल का? असा प्रश्न विराटला विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यानं थेट यावर नकार दिला. यावेळी कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे यावरही कोहलीनं स्पष्टीकरण दिलं. “हार्दिक गोलंदाजी करू शकत नाही आणि आम्हाला खात्री आहे की तो गोलंदाजी करणार नाही. आयपीएलमध्येही आम्ही त्याचा खेळ पाहिला आहे. परंतु कसोटी सामने हे निराळंच आव्हान आहे आणि आम्हाला त्याच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे,” असं विराट म्हणाला.

“आमची याबाबत चर्चाही झाली आहे. तो दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसारख्या परदेशातील परिस्थितीमध्ये त्याचा खेळ संतुलित असतो. त्यावेळी त्याची गोलंदाजीही संतुलित असते,” असं विराट म्हणला. आपल्या गोलंदाजीतही सुधारणा होणअयाची आवश्यकता असल्याचं पांड्याला वाटत असल्याचंही विराटनं सांगितलं. “हार्दिकला कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्याची इच्छा आहे. तसंच या सामन्यांसाठी आपण उपलब्ध असावं असंही त्याला वाटत आहे. पाच दिवसांच्या सामन्यात अतिरिक्त योगदान अतिशय आवश्यक असतं,” असंही विराटनं स्पष्ट केलं.