विश्वचषक क्रिकेट स्पध्रेची उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत राखण्यासाठी जिगरबाज बांगलादेशला सोमवारी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. मात्र भारताला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत झगडायला लावणाऱ्या अफगाणिस्तान संघाच्या कर्णधाराने बांगलादेशला सामन्याआधीच एक संदेश वजा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलाबदीन नैब याने बांगलादेशला ‘हम तो डूबे हैं सनम, तुझे भी ले डूबेंगे’ अशा शब्दात आम्हाला कमी लेखणे तुम्हाला भारी पडेल. तुमचा पराभव करत तुम्हालाही स्पर्धेबाहेर घेऊन जाणार असल्याचा इशाराच नैबने दिला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघाची काय रणनिती असेल या प्रश्नाला उत्तर देताना, ‘हम तो डूबे हैं सनम, तुझे भी ले डूबेंगे हाच आमचा सामन्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन असेल’ असं मिश्कील उत्तर दिलं. पुढे बोलताना त्याने ‘कोणत्याही संघाने आम्हाला कमी लेखणे चुकीचे ठरेल. पहिल्या चार सामन्यांमध्ये आम्ही अगदीच वाईट खेळ केला. मात्र प्रत्येक दिवस आमच्या खेळात सुधारणा होत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की सोमवारचा दिवस आमचा असेल,’ असे मत मांडले.

इंग्लंडचा शुक्रवारी श्रीलंकेने पराभव केल्यामुळे आता विश्वचषकामधील रंगत वाढली आहे. उपांत्य फेरीच्या स्थानासाठी बांगलादेशसुद्धा शर्यतीत आहे. मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखालील बांगलादेशने आतापर्यंतच्या सहा सामन्यांत पाच गुण मिळवून गुणतालिकेत सहावे स्थान राखले आहे. बांगलादेशने वेस्ट इंडिजचे ३२२ धावांचे लक्ष्य ४१.३ षटकांत आरामात पेलले. मग ऑस्ट्रेलियाच्या ३९२ धावांच्या लक्ष्याचा आत्मविश्वासाने पाठलाग करताना ८ बाद ३३३ धावा केल्या. शाकिब अल हसन तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरून सातत्यपूर्ण फलंदाजीचा प्रत्यय घडवत आहे. अफगाणिस्तानचा संघ विश्वचषकामधील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. सर्वच्या सर्व सहा सामन्यांमध्ये पराभव झाल्याने अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. मात्र भारताविरुद्धच्या कामगिरीने त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल. त्यामुळे बांगलादेशला आज विजय मिळाला नाही तर त्यांचे उपांत्य फेरीच्या आशा मावळतील.