पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानेश कनेरियाने अखेर मॅच फिक्सिंगची कबुली दिली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या माहितीपटात त्याने कबुली दिली असून फिक्सिंगसाठी त्याने पाकिस्तानची माफी देखील मागितली आहे.

इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात फिक्सिंग प्रकरणात दानेश कनेरियावर आजीवन बंदी आहे. दानेशने वारंवार हे आरोप फेटाळून लावले होते. शेवटी दानेशने अल- जझीरा या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या माहितीपटात फिक्सिंगची कबुली दिली. यात कनेरिया म्हणतो, माझं नाव दानेश कनेरिया. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने माझ्यावर दोन आरोप केले होते. मी हे आरोप मान्य करतो. हो माझ्या हातून चूक घडली होती. एसेक्स संघातील माझा सहकारी वेस्टफिल्डचीही मी माफी मागतो. एसेक्स संघाचे चाहते, एसेक्स क्रिकेट क्लब आणि पाकिस्तानची मी माफी मागतो.

क्रिकेटप्रेमींनी मला माफ करावे. क्रिकेटने माझ्या आयुष्यात खूप काही दिलं आहे. मला आता याची परतफेड करायची आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने मला आणखी एक संधी दिल्यास मी तरुण पिढीला मदत करायला तयार आहे. जर तुम्ही चूक केली तर तुमचे करिअर माझ्यासारखंच उद्ध्वस्त होईल, हे मी त्यांना सांगणार असल्याचे कनेरियाने सांगितले.

एवढी वर्ष हे आरोप का फेटाळले याबाबत कनेरिया म्हणतो, मी माझ्या वडिलांना सामोरे जाण्याचा धाडस करु शकत नव्हतो. त्यांची प्रकृती खालावत होती आणि अशा स्थितीत मी त्यांना आणखी दु:ख देऊ शकत नव्हतो. त्यांना माझा अभिमान होता. मी माझ्या वडिलांचीही माफी मागतो, असे दानेशने सांगितले.

दानेशने एसेक्समधील त्याचा सहकारी वेस्टफिल्डची बुकी अनू भटशी ओळख करुन दिली होती. एका षटकांत ११ धावा देण्यासाठी भटने वेस्टफिल्डला सात हजार डॉलर दिले होते. या प्रकरणात वेस्टफिल्ड दोन महिने तुरुंगातही होता. कनेरियाने कबुली दिल्यानंतर वेस्टफिल्डनेही प्रतिक्रिया दिली. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली होती. त्यासाठी मी कधीच कोणालाही जबाबदार धरणार नाही, असे त्याने सांगितले.