आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा क्रिकेट सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्याची नामी संधी होती. पण मोक्याच्या क्षणी हवेत चेंडू टोलवून रवींद्र जडेजा बाद झाला आणि भारताला सामना जिंकता आला नाही. या सामन्यात भारताच्या फलंदाजांची कामगिरी सुमार झाली यात शंकाच नाही. पण त्या व्यतिरिक्त भारताला आणखी एका गोष्टीचा फटका बसला, ते म्हणजे पंचांचे चुकीचे निर्णय.

भारतीय संघाला पंचांच्या काही चुकीच्या निर्णयांना सामोरे जावे लागले. सामन्यात धोनी आणि दिनेश कार्तिक यांना पंचांनी पायचीत झाल्याचा निर्णय दिला. मात्र, रिप्लेमध्ये पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले. परंतु भारतीय संघाकडे रिव्ह्यूची संधी शिल्लक नसल्याने संघाला पंचांच्या खराब निर्णयाचे शिकार व्हावे लागले. याशिवाय, सामन्याच्या शेवटच्या षटकात रविंद्र जडेजाने लगावलेला फटका षटकार असतानाही सामन्याच्या तिसऱ्या पंचांनी तो चौकार असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे अखेर टीम इंडियाचा विजय अवघ्या एका धावेने हुकला आणि सामना बरोबरीत सुटला.

याबाबत सामना संपल्यानंतर धोनीला विचारले. तेव्हा धोनीने मिश्किल उत्तर दिले. ‘भारतीय खेळाडूंना काही गोष्टींवर लक्षपूर्वक काम करण्याची गरज आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. कारण मला दंड भरण्याची इच्छा नाही’, अशी मिश्किल प्रतिक्रिया धोनीने दिली. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पंचांचा नामोल्लेख न करता नाराजी व्यक्त केली. धोनीच्या संयमी वक्तव्यातून त्याचा ‘कॅप्टनकूल’ अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.