भारतीय संघातील सलामीचा फलंदाज शिखर धवन याने श्रीलंकेविरुद्ध कारकिर्दीतील दहावे शतक झळकावले. या सामन्यात त्याने १२८ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १२५ धावांची खेळी केली. मलिंगाने त्याला बाद केले. २०१० मध्ये शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्यानंतर २०१३ मध्ये रंगलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत ५ सामन्यात त्याने ९०. ७५ च्या सरासरीने ३६३ धावा केल्या होत्या. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. यात ३५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या कामगिरीमुळे तो यंदाच्या स्पर्धेत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भारतीय संघ गतविजेतेपद राखणार का? या प्रश्नासोबतच शिखर धवनची चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील जुनी खेळी पुन्हा पाहायला मिळणार का? या विषयाची चर्चा क्रिकेट जाणकारांमध्ये रंगली होती.

या स्पर्धेच्या सराव सामन्यापासून दमदार सुरुवात करत शिखरने स्पर्धेसाठी पूर्ण सज्ज असल्याचे दाखवून दिले. पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात देखील त्याची बहरदार खेळी पाहायला मिळाली. या सामन्यात ६५ चेंडूत त्याने ६८ धावांची खेळी केली होती. यात ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या सामन्यात मोठ्या खेळीकडे वाटचाल करत असताना शदाब खानच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. या सामन्यातील खेळीने आत्मविश्वास दुणावल्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही तो आत्मविश्वासाने खेळताना दिसला. या सामन्यात धवनने कारकिर्दीतील दहावे शतक पूर्ण केले. भारतीय संघाचे त्याने ७८ सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून, दहा शतकांसह १८ अर्धशतकाच्या जोरावर त्याने तीन हजारांपेक्षा अधिक धावा ठोकल्या आहेत. त्याच्या दमदार खेळीमुळे भारतीय संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.