आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीनेही (आयसीसी) इंटरनेटवर सध्या धुमाकुळ घालत असणारे टेन इयर्स चॅलेंज स्वीकारले आहे. मात्र त्यांनी या चॅलेंजच्या माध्यमातून भारताला दुसरा एकदिवसीय सामना जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला आगळ्यावेगळ्या पद्धतीने सलाम केला आहे. ३७ वर्षीय धोनीने काल (मंगळवारी) झालेल्या सामन्यामध्ये भारताला विजय मिळवून दिला. त्याच पार्श्वभूमीवर आयसीसीने हे ट्विट केले आहेत.

इंटरनेटवर सध्या व्हायरल झालेल्या #10YearChallenge मध्ये नेटकरी त्यांचा २००९ सालात काढलेला आणि आत्ता म्हणजेच १० वर्षांनंतरचा असे दोन फोटो सोशल मडियावर शेअर करताना दिसत आहेत. दहा वर्षात आपल्यामध्ये किती बदल झाला आहे दाखवण्यासाठी नेटकरी हे चॅलेंज स्वीकारताना दिसत आहेत. या चॅलेंजमध्ये आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटी, ब्रॅण्ड्सबरोबर सामान्यांनाही आपले २००९चे आणि २०१९चे फोटो पोस्ट केले आहेत.

#10YearChallenge हा हॅशटॅग वापरून पोस्ट केलेल्या फोटोंबरोबर अनेकांना आपल्यामध्ये खूपच बदल झाल्याचे म्हटले आहे. मात्र धोनी यामध्ये थोडा वेगळा ठरतो असंच म्हणावं लागेल. कारण धोनी २००९ सालीही षटकार मारून सामने जिंकून द्यायाच आणि आता १० वर्षांनंतरही तो तशाच पद्धतीने सामने जिंकून देतो. अशाच आशयाचे ट्विट आयसीसीने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये आयसीसीने, ‘#2009vs2019 धोनी आजही षटकार मारुन धावांचा पाठलाग पुर्ण करतो’ असं म्हटलं आहे.

धोनीबरोबरच इतर काही खेळाडूंचेही दहा वर्षापूर्वीचे फोटो आयसीसीने ट्विट केले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये सुरुवातील संयमी खेळी करुन शेवटी फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून देणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. अनेकांनी व्हिंटेज धोनी परत सापडल्याचे सोशल नेटवर्किंगवर म्हटले होते.