अध्यक्ष असूनही विजेत्या संघाला चषक देण्याचा मान नाकारल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष मुस्तफा कमाल संतप्त झाले आहेत. ‘‘काही लोकांच्या नाठाळ कृत्यामुळे विजेत्या संघाला चषक प्रदान करण्याचा माझा घटनात्मक अधिकार हिरावला गेला. या लोकांचे गैरप्रकार उघडकीस आणेन,’’ अशी धमकी कमाल यांनी दिली आहे. ‘‘यंदाच्या वर्षी सुरुवातीलाच आयसीसीच्या बदललेल्या नियमानुसार अध्यक्षाला विजेत्या संघाला जेतेपदाचा चषक देण्याचा मान आहे. मात्र मला या बहुमानापासून नाकारण्यात आले. माझ्या हक्कांची पायमल्ली झाली. घरी परतल्यानंतर मला चषक देण्यापासून रोखणाऱ्या व्यक्ती आणि त्यांचे वर्तन उघडकीस आणेन,’’ असे कमाल यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले. बांगलादेशचा पराभव सदोष पंचगिरीमुळे झाला असून, त्यामुळेच भारतीय संघाने उपांत्य फेरीत वाटचाल केली, असे वादग्रस्त विधान कमाल यांनी केले होते. दरम्यान, आयसीसी आयोजित स्पर्धामध्ये अध्यक्षांकडे जेतेपद देण्याचा मान आहे. मात्र प्रशासकीयदृष्टय़ा अध्यक्ष केवळ नामधारी पद असून, कार्याध्यक्षांकडे सर्वाधिकार आहेत.