ICC T20 Rankings: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड टी२० मालिकेत इंग्लंडने २-१ असा विजय मिळवला. या मालिकेत दमदार कामगिरी करणारा डेव्हिड मलाने याने चार स्थानांची झेप घेत थेट अव्वलस्थान पटकावले. त्याच्या या बढतीमुळे पाकिस्तानचा बाबर आझम अव्वलस्थानावरून घसरून दुसऱ्या स्थानी पोहोचला. या व्यतिरिक्त भारताचा केएल राहुल दोन पायऱ्या उतरून चौथ्या स्थानी, तसेच न्यूझीलंडचा कॉलीन मुनरो एका स्थान उतरून पाचव्या स्थानी तर इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन तीन स्थानांच्या घसरणीसह दहाव्या स्थानी फेकला गेला. भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे कर्णधार विराट कोहली एक स्थानाच्या बढतीसह नवव्या स्थानी आला. याशिवाय अफगाणिस्तानचा हजरतउल्लाह झझई आणि वेस्ट इंडिजचा एव्हिन लुईस यांनीही एका स्थानाची झेप घेतली. टॉप १० व्यतिरिक्त जॉनी बेअरस्टो तीन स्थानांच्या बढतीसह १९व्या स्थानी तर जोस बटलर १२ स्थानांच्या उडीसह २८व्या स्थानी विराजमान झाला आहे.

गोलंदाजांच्या ताज्या यादीनुसार, ऑस्ट्रेलियाची २ स्थानांनी घसरण झाली असून तो पाचव्या स्थानी फेकला गेला आहे, तर इमाद वासिम आणि शाबाद खान यांचीही एका स्थानाने घसरण झाली आहे. इंग्लंडच्या आदिल रशीदला २ स्थानांची बढती मिळून तो सातव्या स्थानी, ऑस्ट्रेलियाचा केन रिचर्डसन दोन स्थानांच्या बढतीसह दहाव्या स्थानी तर आफ्रिकेचा तबरेज शास्मी एक स्थानाच्या बढतीसह चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे. टॉप १० व्यतिरिक्त मिचेल स्टार्क ७ स्थानांच्या बढतीसह १८व्या स्थानी तर इंग्लंडचा मार्क वूड ४१ स्थानांच्या बढतीसह ७९व्या स्थानी पोहोचला आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ग्लेन मॅक्सवेलना सीन विल्यम्सला एक स्थान खाली ढकलत दुसरे स्थान पटकावले आहे. याशिवाय दोन दिवसांपूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी २० क्रमवारीतील अव्वलस्थान समान गुणांसह विभागण्यात आले होते. पण शेवटचा टी२० सामना जिंकत त्यांनी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

आता ११ सप्टेंबरपासून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे.