England tour of india 2021 : चेन्नई येथे पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिले दोन सामने चेन्नई येथे तर उर्वरित दोन सामने अहमदाबाद येथील मैदानावर होणार आहेत. चेन्नई येथे दोन्ही संघानं कसून सरावाला सुरुवात केली आहे. अहमदाबाद येथे होणारा मालिकेतील तिसरा सामना दिवसरात्र कसोटी सामना असणार आहे. भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर यानं भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेची भविष्यवाणी केली आहे. गौतम गंभीरनं या मालिकेवर सर्वस्वी भारतीय संघाचं वर्चस्व असल्याचं म्हटलं आहे.

अननुभवी फिरकी त्रिकुटामुळे भारताविरुद्धच्या आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला एकही लढत जिंकणे फार कठीण जाईल, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले. ‘‘इंग्लंडच्या संघात मोईन अली हा एकमेव अनुभवी फिरकीपटू असून जॅक लीच आणि डॉम बेस प्रथमच भारतात आले आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवण्यासाठी इंग्लंडच्या गोलंदाजांना अथक परिश्रम घ्यावे लागतील. गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या कसोटीचा अपवाद वगळल्यास भारतच ही मालिका ३-१ अथवा ३-० अशा फरकाने जिंकेल,’’ असे गंभीर म्हणाला.

आणखी वाचा- ‘विराट’ विक्रमासाठी सज्ज… धोनीचा मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत कोहली

गौतम गंभीर म्हणाला की, या कसोटी मालिकेवर भारतीय संघाचं वर्चस्व राखेल. भारतीय संघ ३-० किंवा ३-१ असा विजय मिळवले. माझ्या मते पावसाचा व्यत्यय न आल्यास मालिकेतील सर्व सामन्याचा निकाल लागेल.

चेन्नईत वरचढ कोण?

चेन्नईमध्ये भारतीय संघानं ३२ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये १४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ११ सामने अनिर्णित राखले आहेत. या मैदानावर भारतीय संघाला ६ सामन्यात पराभव पाहावा लागला आहे. चेन्नईच्या मैदानावर भारतीय संघानं इंग्लंडविरोधात सात गड्यांच्या मोबदल्यात ७५९ धावांचा डोंगर उभा केला होता. ही भारताची सर्वोत्तम धावसंख्या आहे.