‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत एकेकाळी रोशनसिंग सोढी हे पात्र साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या अभिनेत्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तो सकाळी मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाला, पण विमानात बसलाच नव्हता अशी माहिती समोर आली होती. या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता झाल्याबद्दल दक्षिण-पश्चिम दिल्लीचे डीसीपी रोहित मीना म्हणाले, “गुरुचरण सिंगच्या कुटुंबीयांनी आमच्याकडे तक्रार दिली की ते २२ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता मुंबईला जाणार होते, पण ते मुंबईला गेले नसून बेपत्ता आहेत. आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा अनेक बाजूंनी तपास करत आहोत. आम्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करत आहोत. आतापर्यंत आम्हाला अनेक महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत, त्यावर आमची टीम काम करत आहे. आम्ही आयपीसीच्या कलम ३६५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक तपासात सीसीटीव्हीत जे दिसतंय त्यानुसार ते बॅकपॅक घेऊन जाताना दिसत आहेत.” एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
गुरुचरण सिंग घरातून विमानळावर जाण्यासाठी निघाला, पण तो विमानात बसलाच नाही. पण त्यापूर्वी त्याने त्याची मुंबईतील मैत्रीण भक्ती सोनीला मेसेज करून बोर्डिंग प्रोसेस करत असल्याचं सांगितलं होतं. पण अचानक त्याचा संपर्क तुटला, कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला मात्र काहीच माहिती न मिळाल्याने त्यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पालम पोलिसांत दिली.