न्यूझीलंड दौऱ्यात टी-२० मालिकेत ५-० असा धडाकेबाज मालिका विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाची यानंतरच्या सामन्यांमध्ये मात्र घसरगुंडी उडाली आहे. वन-डे मालिका गमावल्यानंतर, पहिल्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाची त्रेधातिरपीट उडालेली दिसली. वेलिंग्टन कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या तेजतर्रार माऱ्यासमोर भारतीय फलंदाजी पुरती कोलमडली. पहिल्या डावात भारतीय संघ केवळ १६५ धावांपर्यंत मजल मारु शकला.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने ३४८ धावांपर्यंत मजल मारत सामन्यात १८३ धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावातही टीम इंडियाची चांगलीच दाणादाण उडाली. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्या माऱ्यासमोर सर्व भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. दुसऱ्या डावात मयांक अग्रवालने एकाकी झुंज दिली. दरम्यान न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीने या सामन्यात त्रिशतक साजरं केलं आहे.

तिसऱ्या दिवसाच्या खेळात मयांक अग्रवालचा बळी मिळवत टीम साऊदीने न्यूझीलंडकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी घेण्याचा विक्रम केला आहे. मयांक अग्रवाल हा साऊदीचा ३०० वा बळी ठरला. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनिअल व्हिटोरीच्या नावावर याआधी २९९ बळी जमा होते.