न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ संकटात सापडला आहे. पहिल्या डावात १६५ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर, न्यूझीलंडच्या संघाने ३४८ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून केन विल्यमसन, रॉस टेलर, कायल जेमिसन, कॉलिन डी-ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट यांनी फटकेबाजी केली. पहिल्या डावात न्यूझीलंडला १८३ धावांची भक्कम आघाडीही मिळाली. दरम्यान दुसऱ्या डावातही भारताच्या फलंदाजांनी काहीशी निराशाच केली.

दुसऱ्या डावात मयांक अग्रवालचा अपवाद वगळता आघाडीच्या फळीतला एकही भारतीय फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. कर्णधार विराट कोहली १९ धावांवर माघारी परतला, ट्रेंट बोल्टने त्याचा बळी घेतला. मात्र या १९ धावांच्या खेळीतही विराटने भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला मागे टाकलं आहे.

कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज –

  • सचिन तेंडुलकर – १५ हजार ९२१
  • राहुल द्रविड – १३ हजार २६५
  • सुनिल गावसकर – १० हजार १२२
  • व्ही.व्ही.एस.लक्ष्मण – ८ हजार ७८१
  • विरेंद्र सेहवाग – ८ हजार ५०३
  • विराट कोहली – ७ हजार २१६*
  • सौरव गांगुली – ७ हजार २१२

दरम्यान विराट कोहलीने हा विक्रम मोडला असला तरीही न्यूझीलंड दौऱ्यातील त्याची फलंदाजीतली खराब कामगिरी हा चिंतेचा विषय ठरतो आहे.

दुसऱ्या डावात मयांक अग्रवालने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. त्याने ९९ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या.