कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुण्याती गहुंजे मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवला आहे. १ डाव आणि १३७ धावांनी विजय मिळवत भारताने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीसाठी हा विजय खास ठरला आहे. कर्णधार या नात्याने विराट कोहलीचा हा ५० वा सामना होता. याच सामन्यात विजय मिळवण्यासोबतच विराटने नाबाद द्विशतकी खेळी करत कसोटी क्रिकेटमध्ये आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. यादरम्यान विराट कोहलीने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीलाही मागे टाकलं आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांत डावाने विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. पुणे कसोटीत डावाने मिळवलेला विजय हा विराटच्या नेतृत्वाखाली भारताचा आठवा विजय ठरला आहे. सौरव गांगुलीच्या नावावर कर्णधार या नात्याने कसोटी क्रिकेटमध्ये डावाने सात विजयाची नोंद आहे.

या मालिका विजयामुळे भारताचं आयसीसी कसोटी क्रमवारीतलं पहिलं स्थान अधिक भक्कम होणार आहे. या मालिकेतला अखेरचा सामना १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.