टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत १-० ने आघाडी घेतली आहे. दीपक हुडा आणि इशान किशन यांच्या खेळींनंतर पदार्पणवीर शिवम मावी आणि उमरान मलिक या युवा गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर दोन धावांनी विजय मिळवला. दरम्यान, फलंदाजी करत असताना वाइड न दिल्याने दीपक हुडा अम्पायरवर संतापला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IND vs SL 1st T20: हार्दिक ब्रिगेडने केले लंकादहन! टीम इंडियाचा श्रीलंकेवर दोन धावांनी विजय, मालिकेत १-० ने आघाडी

वानखेडे मैदानात झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर १६३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. १५ व्या ओव्हरमध्ये कर्णधार हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर भारतीय संघाची स्थिती ९४ धावांवर ५ गडी बाद अशी होती. यानंतर दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनी संघाला सावरलं.

दरम्यान १८ वी ओव्हर सुरु असताना दीपक हुडा अम्पायवर संतापल्याचं पाहायला मिळालं. झालं असं की, कसून रजिथा गोलंदाजी करत असताना चेंडू रेषेबाहेर जात असल्याने दीपक हुडाने तो वाइड देतील या अपेक्षेने सोडून दिला. पण दीपक हुडा पुढे सरकला असल्याने अम्पायरने वाइड दिला नाही. यानंतर त्याने अम्पायरकडे पाहून आपला संताप व्यक्त केला. पुढच्या चेंडूवर एक धाव काढल्यानंतर दीपक हुडाने पुन्हा एकदा अम्पायरकडे वाइड का दिला नाही याबद्दल जाब विचारला.

अखेरच्या षटकाचा थरार

श्रीलंकेला अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने या षटकातील पहिला चेंडू वाइड टाकला. यानंतर कसून रजिथाने एक धाव काढत करुणारत्नेला फलंदाजीची साथ दिली. यानंतर चेंडू अक्षरने निर्धाव टाकला. त्यामुळे श्रीलंकेला चार चेंडूत ११ धावा करायच्या होत्या. पुढच्याच चेंडूंवर करुणारत्नेने षटकार लगावल्याने श्रीलंकेसमोर तीन चेंडूत अवघ्या पाच धावांचे लक्ष्य राहिले. अक्षरने पुन्हा चेंडू निर्धाव टाकला. पुढील चेंडूवर रजिथा धावतीच झाला. पण एक धाव पूर्ण केल्याने करुणारत्ने पुन्हा स्ट्राइकवर आला. अखेरच्या चेंडूवर संघाला चार धावा हव्या होत्या. मात्र त्यांना एकच धाव काढता आली.