उत्कंठापूर्ण लढतीत भारताने अर्जेटिनावर ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवत जोहोर चषक कनिष्ठ हॉकी स्पर्धेत आव्हान राखले.
सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला भारताच्या अरमान कुरेशीने डाव्या बाजूने जोरदार चाल केली व अर्जेटिनाचा गोलरक्षक एमिलिआनो बोस्सोला चकवत संघाचे खाते उघडले. ११व्या मिनिटाला गुरजंत सिंगने भारताचा दुसरा गोल नोंदवला. ३४व्या मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नरची संधी वाया घालविली. त्यामुळे पूर्वार्धात त्यांना २-० याच आघाडीवर समाधान मानावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तरार्धात अर्जेटिनाच्या खेळाडूंनी आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या ३९व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत कर्णधार मैको कॅसेलाने अचूक फटका मारून संघाचा पहिला गोल केला. हा गोल स्वीकारल्यानंतर भारताच्या सांता सिंग, मनप्रीत सिंग, सीमरनजित सिंग व कर्णधार हरजित सिंग यांनी धारदार आक्रमण केले. अखेर ५०व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत नीलकांता शर्माने गोल करीत संघाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र ५४व्या मिनिटाला अर्जेटिनाने गोल करीत सामन्यातील रंगत वाढविली. निकोलस कीनानने अप्रतिम गोल साकारला. भारताची चौथ्या सामन्यात मलेशियाशी गाठ पडणार आहे. गुरुवारी (१५ ऑक्टोबर) हा सामना होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India beat argentina 3 2 in sultan of johor cup
First published on: 15-10-2015 at 02:02 IST