‘सुपर सिक्स’मध्ये पोहोचण्यासाठी विजय अनिवार्य
श्रीलंकेविरुद्ध आज अखेरचा साखळी सामना
गतविजेत्या इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर यजमान भारताला ‘सुपर-सिक्स’मध्ये पोहोचण्यासाठी लंकादहन करण्यावाचून पर्यायच नसेल. ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारतीय संघ श्रीलंकेशी दोन हात करणार असून हा सामना दोन्ही संघांसाठी ‘जिंकू किंवा मरू’ असाच असेल. कारण या सामन्यात जो संघ विजयी ठरेल त्याचे स्पर्धेतील आव्हान टिकून राहील आणि जो पराभूत होईल त्या संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागणार आहे.
‘अ गटामध्ये चारही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवलेला आहे, त्यामुळे जे संघ मंगळवारी विजयी ठरतील, त्यांनाच ‘सुपर सिक्स’मध्ये पोहोचता येणार आहे.
पहिल्या साखळी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवून श्रीगणेशा केला होता. या सामन्यात थिरूशकामिनीचे शतक आणि पूनम राऊतने अर्धशतक झळकावत १७५ धावांची सलामी दिली होती. पण इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात या दोघींनाही मोठी खेळी साकारता आली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीत कौरने शतक झळकावत मधल्या फळीतही दम असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे तिसऱ्या महत्वाच्या सामन्यात तिच्याकडून अपेक्षा वाढलेल्या असतील. त्याचबरोबर चांगली सलामी देण्याची पूनम आणि थिरूशकामिनीकडून अपेक्षा असेल. कर्णधार मिताली राजकडे अनुभव असला तरी तिला आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात ती कशी कामगिरी करते, याकडे सर्वाचेच लक्ष राहील. गोलंदाजीमध्ये झुलान गोस्वामीवर साऱ्यांचे लक्ष असेल, दोन्ही सामन्यांत तिने विकेट्स मिळवलेल्या आहेत. निरंजना नागराजन आणि गौहर सुलताना यांनी गेल्या सामन्यात बऱ्याच धावा दिल्या असून त्यांच्याकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
‘सुपर सिक्स’मध्ये पोहोचण्यासाठी आमच्यासाठी श्रीलंकेविरुद्धचा सामना ‘जिंकू किंवा मरू’ असाच असेल. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आम्ही नक्कीच गाफिल राहणार नाही. कारण या खेळपट्टीवर कोणताही संघ सामना जिंकू शकतो. इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करीत त्यांनी अनपेक्षित विजय मिळवला होता. या सामन्यात आम्ही लौकिकाला साजेशी कामगिरी करू, अशी आशा भारताची कर्णधार मिताली राज हिने व्यक्त केली.
दुसरीकडे श्रीलंकेने पहिला सामना जिंकलेला असला तरी दुसऱ्या सामन्यात त्यांची वेस्ट इंडिजपुढे ससेहोलपट झालेली होती. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांचे मनोबल खचलेले असेल.
गचाळ क्षेत्ररक्षणामुळे आम्ही सामना गमावला होता, त्याचबरोबर वेस्ट इंडिजविरुद्ध आमची गोलंदाजीही चांगली झाली नाही. त्यामुळे संघाचे मनोबल खचलेले आहे. पण तरीही आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये काही ज्या सकारात्मक गोष्टी आहेत, त्यांचा विचार करावा, असे मी संघाला सांगितले आहे. आमच्यावर आत्ताच्या घडीला भरपूर दडपण असले, तरी दडपणाखाली चांगला खेळ कसा करायचा हे आम्हाला अवगत आहे, असे श्रीलंकेची कर्णधार शशिकला सिरिवरदेनाने सांगितले.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : मिताली राज (कर्णधार), पूनम राऊत, थिरुशकामिनी, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), अमिता दास, एकता बिश्त, झुलान गोस्वामी, करुणा जैन, रीमा मल्होत्रा, मोना मेश्राम, सुलक्षणा नाईक, निरंजना नागराजन, रसनारा परवीन, सुभलक्ष्मी शर्मा आणि गौहर सुलताना.
श्रीलंका : शशिकला सिरिवरदेनाने (कर्णधार), संडामाली डोलवट्टा, चमारी अट्टापथटू, ईशानी लोकूसुरिया, लसांथी मधुशानी, दिलानी मनोदरा, यसोदा मेंडिस, उदेशिका प्रबोदिनी, ओसादी रणसिंघे, इनोका रणवीरा, दीपिका रसंगिका, शेरिना रवीकुमार, चमानी सेनेविराथने, प्रसादिनी वीराक्कोडी, श्रीपाली वीराक्कोडी.
वेळ : दुपारी २.३० पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.
इंग्लंडची गाठ वेस्ट इंडिजशी
मुंबई : गतविजेता इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या संघांनी पहिल्या सामन्यात पराभव पत्करला असला तरी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत त्यांनी स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले आहे. इंग्लंडची कर्णधार चार्लेट एडवर्ड्सने भारताविरुद्ध शतकीय खेळी साकारली होती. तिच्या अनुभवी फलंदाजीवर संघाची मदार असेल. गोलंदाजीमध्ये कॅथेरीन ब्रंट चांगल्या फॉर्मात आहे.
वेस्ट इंडिजच्या संघातील स्टेफनी टेलर जबरदस्त फॉर्मात आहे. गेल्या सामन्यात तिच्या घणाघाती शतकाने श्रीलंकेच्या गोलंदाजीची हवा काढली होती. त्याचबरोबर डिएन्ड्रा डॉटिनच्या अष्टपैलू कामगिरीवर साऱ्यांचीच नजर असेल. हा सामना दोन्ही संघांना जिंकणे अनिवार्य असून जो संघ पराभूत होईल त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2013 रोजी प्रकाशित
लंकादहनासाठी भारत सज्ज
‘सुपर सिक्स’मध्ये पोहोचण्यासाठी विजय अनिवार्य श्रीलंकेविरुद्ध आज अखेरचा साखळी सामना गतविजेत्या इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर यजमान भारताला ‘सुपर-सिक्स’मध्ये पोहोचण्यासाठी लंकादहन करण्यावाचून पर्यायच नसेल. ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारतीय संघ श्रीलंकेशी दोन हात करणार असून हा सामना दोन्ही संघांसाठी ‘जिंकू किंवा मरू’ असाच असेल.
First published on: 05-02-2013 at 04:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India has ready to defit srilanka