‘पहिले पाढे पंचावन्न’ ही म्हण भारतीय संघाने नागपूरच्या जामठा मैदानावर आपल्या सुमार प्रदर्शनाच्या जोरावर खरी ठरवली. इंग्लंडचे फलंदाजीचे शेपूट झटपट गुंडाळण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर पत्करलेली शरणागती यामुळे नागपूर कसोटीही मुंबई आणि कोलकाता कसोटीच्या वळणावर आहे. ५ बाद १९९ अशा अवस्थेत असलेल्या इंग्लंडच्या संघाने भारताच्या फिरकी आक्रमणावर वर्चस्व गाजवत तीनशेचा टप्पा ओलांडला. त्यानंतर खेळपट्टीचा नूर ओळखून गोलंदाजी करत भारताच्या रथी-महारथी फलंदाजांना माघारी धाडून दुसरा दिवस आपल्या नावावर केला.
पीयूष चावलाने आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत पाहुण्यांचा पहिला डाव ३३० धावांवर संपुष्टात आणला. ही धावसंख्या आव्हानात्मक निश्चितच नव्हती, पण अव्वल फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना घाम गाळण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे जितके खेळाडू बाद झाले, जवळजवळ तेवढेच बळी गमावून भारताने ‘हम भी कुछ कम नहीं’, हे दाखवून दिले. हा सामना निर्णायक ठरणार, अशी चिन्हे असून पारडे मात्र कुणाच्या बाजूने झुकणार हे शनिवारी खेळपट्टीचा रंग कसा असेल, यावरूनच ठरेल. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३३० या धावसंख्येच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने दिवसअखेर ४ विकेट्स गमावून ८७ धावा केल्या. कसोटी पदार्पण करणाऱ्या जो रूटच्या संयमी ७३ धावा आणि फिरकीपटू पीयूष चावलाने घेतलेले एकूण चार बळी, हे शुक्रवारच्या खेळाचे वैशिष्टय़ म्हणता येईल.
जामठय़ाच्या ‘पाटा’ खेळपट्टीवर भारतीय फलंदाज दमदार खेळी करतील, अशी आशा होती. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर ही सलामीची जोडी फलंदाजीसाठी उतरल्यानंतर साऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र पहिल्याच षटकात सेहवागची दांडी उडाली आणि ‘आता काय होणार’ या विचाराने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिसऱ्याच चेंडूवर जेम्स अँडरसनच्या आत जाणाऱ्या चेंडूने थेट यष्टय़ांचा वेध घेतल्याने सेहवाग भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर गंभीर व चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भर घातली. पण फिरकीपटू ग्रॅमी स्वानने पुजाराला इयान बेलकडे झेलबाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर गंभीरने १६वी धाव घेऊन कसोटी क्रिकेटमधील चार हजार धावांचा टप्पा पार केला. आतापर्यंत जामठाच्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी करणारा सचिन तेंडुलकर मोठी खेळी करून आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देईल, अशी अपेक्षा होती. पण जेम्स अँडरसनच्या खाली बसलेल्या चेंडूवर सचिन त्रिफळाचीत झाला अन् त्याच्या निवृत्तीविषयी, भवितव्याविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले. सचिनपाठोपाठ गंभीरही ३७ धावा काढून माघारी परतला. त्यामुळे भारताची ४ बाद ७१ अशी बिकट अवस्था झाली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी (खेळत आहे ८) आणि विराट कोहली (खेळत आहे ११) यांनी उर्वरित षटके खेळून काढत भारताची पडझड रोखली.
तत्पूर्वी, कालच्या ५ बाद १९९ धावसंख्येवरून इंग्लंडने आपला डाव सुरू केला. जो रूट आणि मॅट प्रायर या जोडीने सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून संघाला चांगल्या स्थितीत आणले. आर. अश्विनच्या एका चेंडूवर प्रायर चकित झाला आणि त्याच चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला. पुढील षटकात इशांत शर्माच्या गोलंदाजीवर आत वळणाऱ्या चेंडूवर टिम ब्रेस्नन भोपळाही न फोडता पायचीत होऊन माघारी परतला. इंग्लंडचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना जो रूटने एक बाजू लावून धरली. चावलाने आपल्याच गोलंदाजीवर उडालेला रूटचा झेल टिपला. ग्रॅमी स्वानने ५६ धावांची चांगली खेळी केली. चावलाने चार तर इशांत शर्माने तीन बळी मिळवले.  
धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : अ‍ॅलिस्टर कुक पायचीत इशांत शर्मा १, निक कॉम्प्टन झे. धोनी गो. इशांत शर्मा ३, जोनाथन ट्रॉट त्रि. गो. जडेजा ४४, इयान बेल झे. कोहली गो. चावला १, केव्हिन पीटरसन झे. ओझा गो. जडेजा ७३, इयान बेल झे. कोहली गो. चावला १, जो रूट झे. व गो. चावला ७३, मॅट प्रायर त्रि. गो. अश्विन ५७, टिम ब्रेस्नन पायचीत गो. इशांत ०, ग्रॅमी स्वान पायचीत गो. चावला ५६, जेम्स अँडरसन झे. पुजारा गो. चावला ४, माँटी पनेसार नाबाद १, अवांतर (बाइज-५, लेगबाइज-१२) १७ , एकूण- १४५.५ षटकांत सर्व बाद ३३०.
बाद क्रम : १-३, २-१६, ३-१०२, ४-११९, ५- १३९, ६-२४२, ७-२४२, ८-३०२, ९-३२५, १०-३३०.
गोलंदाजी : इशांत शर्मा २८-९-४९-३, प्रग्यान ओझा ३५-१२-७१-०, रवींद्र जडेजा ३७-१७-५८-२, पीयूष चावला २१.५-१-६९-४, आर. अश्विन ३४-३-६६-१.
भारत (पहिला डाव) : गौतम गंभीर झे. प्रायर गो. अँडरसन ३७, वीरेंद्र सेहवाग त्रि. गो. अँडरसन ०, चेतेश्वर पुजारा झे. बेल गो. स्वान २६, सचिन तेंडुलकर त्रि. गो. अँडरसन २, विराट कोहली खेळत आहे ११, धोनी खेळत आहे ८, अवांतर (बाइज-१, लेगबाइज-२) ३, एकूण- ४१ षटकांत ४ बाद ८७.
बाद क्रम : १-१, २-५९, ३- ६४, ४- ७१.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन ९-२-२४-३, टिम ब्रेस्नन १०-१-२५-०, माँटी पनेसार १४-४-२४-०, ग्रॅमी स्वान ७-३-९-१, जोनाथन ट्रॉट १-०-२-०.