श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार हात करण्यास सज्ज होतोय. येत्या १७ सप्टेबरपासून चेन्नईच्या मैदानातून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठीच्या तिकीट दरासंदर्भात तामिळनाडू क्रिकेट मंडळाने परिपत्रकाद्वारे याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. या माहितीनुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यासाठी १२०० रुपयांपासून ते ८००० रुपयांपर्यंत तिकीट उपलब्ध असेल. १० सप्टेबरपासून ही तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार असून क्रिकेट चाहत्यांना http://www.bookmyshow.com या संकेतस्थळावरुनही तिकिट बूक करता येतील. पाहुण्यांसाठीचे खास तिकीट १२ हजार रुपये इतके आहे.

यापूर्वी चेन्नईच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २०१५ मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळवण्यात आलाहोता. भारताने या सामन्यात विजयी मिळवला होता. सध्याच्या घडीला सातत्यपूर्ण खेळी करणाऱ्या विराट कोहलीने या सामन्यात १३८ धावांची शतकी खेळी केली होती. या सामन्यासाठी तिकिट दर हे ७५० रुपयांपासून सुरु झाले होते.
मात्र यंदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यासाठी ४५० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. वस्तू व सेवा कर लागू झाल्यामुळे तिकीट दरामध्ये वाढ झाल्याचे तामिळनाडू क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची एकदिवसीय मालिकेसह तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. चेन्नईच्या मैदानावर सराव सामन्यासह पहिला एकदिवसीय सामना खेळवल्यानंतर २१ सप्टेंबरला कोलकातामध्ये दुसरा, २४ सप्टेंबरला इंदुरमध्ये तिसरा, २८ सप्टेंबरला बंगळुरूमध्ये चौथा तर १ ऑक्टोबरला अखेरचा एकदिवसीय सामना हा नागपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. ७, १० आणि १३ ऑक्टोबरला रांची, गुवाहाटी आणि हैदराबादमध्ये टी-२० सामने खेळवण्यात येतील.