भारत आणि इंग्लंडमध्ये चालू असलेल्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज के. एल. राहुल दुखापतीतून सावरून या सामन्याद्वारे संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, राहुलची दुखापत अद्याप बरी झालेली नाही. त्यामुळे राहुल पाचव्या कसोटी सामन्यालाही मुकणार आहे. दरम्यान, टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचं संघात पुनरागमन झालं आहे.

दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरदेखील पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा भाग नसेल. रणजी सामना खेळण्यासाठी सुंदरला टीम इंडियातून मुक्त करण्यात आलं आहे. तमिळनाडूचा संघ रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबईशी भिडणार आहे. वॉशिंग्टन सुंदर या सामन्यात तमिळनाडूचं प्रतिनिधीत्व करेल. दरम्यान, सुंदरच्या जागी दुसऱ्या कोणत्याही खेळाडूची संघात निवड करण्यात आलेली नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, राहुल फिटनेस टेस्टमध्ये पास झाला असता तर त्याला संघात संधी दिली जाईल असं निवड समितीने आधी जाहीर केलं होतं. परंतु, राहुल अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याला पाचव्या कसोटीत विश्रांती दिली आहे. बीसीसीआयचं वैद्यकीय पथक राहुलच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. अधिक चांगल्या उपचारांसाठी राहुलला लंडनला पाठवण्यात आलं आहेच.

बुमराहला चौथ्या कसोटीपूर्वी संघातून मुक्त करण्यात आलं होतं. परंतु, पाचव्या कसोटीसाठी तो उपलब्ध असणार आहे. त्यामुळे बुमराह धर्मशालाच्या मैदानावर खेळताना दिसेल. दुखापतग्रस्त मोहम्मद शमी अद्याप संघाबाहेर आहे. शमीवर लंडनमध्ये एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शमीला मैदानावर परतण्यास तीन ते चार महिने वाट पाहावी लागेल. दरम्यान खराब फॉर्ममध्ये असलेला रजत पाटिदार अद्याप टीम इंडियात आहे.

धर्मशाला कसोटीसाठी असा असेल भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटिदार, सर्फराझ खान, के. एस. भरत, देवदत्त पडिक्कल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप