scorecardresearch

भारत-विंडीज ट्वेन्टी-२० मालिका : मालिकाविजयाचे लक्ष्य!

आज दुसऱ्या सामन्यात कोहलीला सूर गवसण्याची भारताला आशा

भारत-विंडीज ट्वेन्टी-२० मालिका : मालिकाविजयाचे लक्ष्य!
(फोटो सौजन्य- AP)

फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत दर्जेदार खेळ करत असलेल्या भारतीय संघाचे शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचे लक्ष्य आहे. या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीला सूर गवसण्याबाबत भारतीय संघ व्यवस्थापन आशादायी आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने विंडीजवर वर्चस्व गाजवले आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर भारताने ट्वेन्टी-२० मालिकेतही विजयारंभ केला. विंडीजचा संघ ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, बुधवारी त्यांना पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. पदार्पणवीर रवी बिश्नोई, रोहित आणि सूर्यकुमार यादव यांच्या अप्रतिम खेळामुळे भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकला. या विजयात कोहलीला मात्र फारसे योगदान देता आले नाही. तो केवळ १७ धावा करून माघारी परतला. त्याआधी तीन एकदिवसीय सामन्यांतही त्याला अनुक्रमे ८, १८ आणि ० धावाच करता आल्या. त्यामुळे त्याचा कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न असेल.

श्रेयस पुन्हा संघाबाहेरच

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात मुंबईकर सूर्यकुमार (१८ चेंडूंत नाबाद ३४) आणि वेंकटेश अय्यर (१३ चेंडूंत नाबाद २४) यांनी अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतासाठी विजयवीराची भूमिका चोख बजावली. तसेच कोहली आणि ऋषभ पंत यांचेही संघातील स्थान पक्के असल्याने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. ‘‘विश्वचषकाचा विचार करता आम्हाला मधल्या फळीत अष्टपैलू खेळाडूचा पर्याय हवा आहे. कोणत्याही खेळाडूला संघाबाहेर ठेवणे अवघड असून आम्ही श्रेयसशी संवाद साधला आहे,’’ असे पहिल्या सामन्यानंतर रोहित म्हणाला.

दुखापतीमुळे चहर मुकणार?

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी मुंबईकर शार्दूल ठाकूरला संघात स्थान मिळू शकेल. या व्यतिरिक्त गोलंदाजीत फार बदल होणे अपेक्षित नाही. पहिल्या सामन्यात बिश्नोई आणि यजुर्वेद्र चहल या दोन लेग-स्पिनर गोलंदाजांनी एकत्रित चांगला मारा केला. वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल सांभाळतील.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, यजुर्वेद्र चहल, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव, हरप्रीत ब्रार.

वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), शाय होप, डॅरेन ब्राव्हो, रॉस्टन चेस, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, कायले मेयर्स, जेसन होल्डर, फॅबियन अ‍ॅलन, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, अकील हुसेन, रोमारियो शेपर्ड, ओडीन स्मिथ, हेडन वॉल्श.

वेळ : सायं. ७ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या